बारामती : सुपे (ता. बारामती) येथे बारामती विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अनिल पोटरे यांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ‘आमच्या नेत्याच्या विरोधात बोलायचे नाही,’ असे धमकावून धक्काबुक्की, तोडफोड केल्या प्रकरणी चौघांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बसपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य काळूराम चौधरी यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुपा बसस्थानकाच्या परिसरात बसपाच्या प्रचार सभेचे आयोजन केले होते. पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत अनिल लांडे, रोहित कांबळे, अजय संभाजी मागाडे, सूरज कांबळे, सचिन मदने, लहू सोनवणे, तसेच उमेदवार अनिल पोटरे या कार्यकर्त्यांची भाषणे झाल्यानंतर चौधरी भाषण करीत असताना सुपे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाचे बॅच लावलेला राजेंद्र जगताप (मंडपवाले) (पूर्ण नाव माहिती नाही), त्याचा जोडीदार अनिश कोतवाल व चांदगुडे आडनाव असलेल्या दोघां तरुणांनी (पूर्ण नाव माहिती नाही) सभा स्थळाजवळ येऊन राष्ट्रवादी पक्षाच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. तेव्हा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून आमच्या पक्षाबद्दल, नेत्याबद्दल आमच्या गावात येऊन एक शब्द देखील बोलायचा नाही, असे धमकावून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, या सभेचे निवडणूक आयोगामार्फत व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला देखील दमदाटी करून शुटींग करायचे नाही, असे धमकावून धक्काबुक्की केली. त्यानंतर प्रचाराचा टेम्पो अशोक लेलंड (क्रमांक एमएच ४२/ एम ३८१८) वरील लावलेला स्पीकर, वायरिंगची तोडफोड केली. सभेत गोंधळ घातला. धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम ७१ क/ १ /२/ ३२३/५०४/५०६/४२७ आणि ३४ सह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) ड नुसार वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
बसपाच्या प्रचारसभेत तोडफोड
By admin | Published: October 09, 2014 5:34 AM