बुधवारी सकाळीच लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केेंद्र उघडण्यापूर्वी लस घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आपल्याला सर्वप्रथम लस मिळावी म्हणून एका तथाकथित सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या वडिलांना आत बसवले. त्यानंतर कागदावर १ ते १०० क्रमांक लिहून ते टोकण म्हणून सर्वांना वाटले. टोकण मिळाले म्हणजे आपणांस लस मिळणार या अपेक्षेत सर्व जण होते. आरोग्य अधिकारी डॉ. दगडू जाधव व रूपाली बंगाळे तेथे पोहोचल्यानंतर मुख्य दारासमोर प्रचंड गर्दी झाली. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. प्रत्येक जण आपापल्या मिळालेल्या क्रमांकाचा कागद दाखवू लागला. परंतू डॉक्टर जाधव यांनी शुक्रवारी टोकन देऊनही लसीकरण न झालेल्यांचेच लसीकरण होईल असे जाहीर केल्याने आजच्या बोगस टोकणधारकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सदर बाब पोलीस ठाण्यास समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी हे कर्मचाऱ्यांसमवेत पोहोचले. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. या गडबडीत तो बोगस टोकण वाटप करणारा कथित सामाजिक कार्यकर्ता लस घेऊन निघून गेला होता.
लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसमोर लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. येथील काम सुरुवातीस व्यवस्थित सुरू होते. भीतीपोटी त्यावेळी लस घेण्यासाठी जास्त जण पुढे येत नव्हते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे नागरिक स्वतःहून पुढे येऊ लागले. परिणामी गर्दीच्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे सर्वत्रच लसीचा तुटवडा जाणवू लागला. याचा फायदा तथाकथित स्वयंभू युवा नेते, समाजसेवक, तसेच बहुतांश राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांनी दबावतंत्र वापरून नातेवाईक व ओळखीचे मित्रमंडळीचे लसीकरण करून घेण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड तसेच पुणे शहर व उपनगरांतील नातेवाईक व मित्रमंडळी या ठिकाणच्या नागरिकांचा समावेश आहे. यामुळे स्थानिक नागरिक यापासून वंंचित राहत असल्याने असंंतोष वाढला आहे. तर लसीकरण करण्यासाठी येत असलेेेल्या दबावांमुुळे आरोग्य अधिकारी व कर्मचारी त्रस्त झालेले दिसत आहेत.
वरिष्ठांना फोन करतो म्हणून बदली करायची धमकी मिळत असल्याने प्रामाणिकपणे काम करूनही घरगड्यासारखी वागणूूक मिळत असल्यानेे नेमके कोणाचे ऐकायाचे या दुहेरी कात्रित हे अधिकारी व कर्मचारी सापडले आहेत. लसीचा पुरवठा मर्यादित स्वरूपात येत असल्याने नागरिकांना हेलपाटे घालावे लागत आहेत. लसीकरणासाठी नोंदणीचे वेळापत्रक नसल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचाही बोजवारा उडत आहे.