पुणे: ससून रुग्णालयात 'एचएमआयएस' (हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम) ही रुग्ण नोंदणी संगणकीकृत प्रणाली बुधवार पासून बंद केली असल्याने रुग्णालयात सकाळपासून गोंधळ उडाला आहे. रुग्ण नोंदणी ठप्प झाल्याने रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी झाली आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या आयुक्तांनी ससूनसह राज्यातील सोळा वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील 'एचएमआयएस' सिस्टीम बुधवार पासून बंद करण्याचा आदेश दिला आहे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची नोंद संगणकीय प्रणालीमध्ये करणे, रुग्णाच्या रक्त व इतर वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल, क्ष-किरण अहवाल, सिटी स्कॅन यांचे अहवाल कागदावर देण्याऐवजी ते डिजिटल पद्धतीने या सिस्टिमवर साठवले जात होते. ते अहवाल रुग्णाचा नोंदणी क्रमांक टाकल्यावर कोठेही पाहता येतात. यामुळे रुग्णांना व डॉक्टर यांना कागदी फाईल घेऊन फिरण्याची गरज पडत नाही. हा प्रकल्प राज्यातील सोळा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २००९ सुरू झाला होता . त्यानंतर रुग्णालयांमध्ये रुग्णाच्या नोंदीपासून ते त्याच्या सर्व वैद्यकीय अहवालांची माहिती एका क्लिकवर डॉक्टरांना मिळू लागली.
ससून रुग्णालयात बुधवारी सकाळी ओपीडी मध्ये रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यांचे रक्तनमुने डॉक्टरांना ऑनलाइन ऐवजी ऑफलाईन द्यावे लागत होते. डॉक्टरांना वैद्यकीय चाचण्या कागदावर लिहून द्याव्या लागत आहेत. त्याचे अहवालदेखील कागदावर मिळतील.