आव्हाळवाडी : वादळी वाऱ्यामुळे वाघोली येथील पुणे-नगर महामार्गासह मांजरी, लोणीकंद, केसनंद परिसरातील होर्डिंगला लावलेले फ्लेक्स फाटून विद्युत वाहिन्यांना गुंडाळल्या जात असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे. महावितरणच्या वतीने मागील वर्षी महसूल, पोलीस व ग्रामपंचायतीला विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या होर्डिंगवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. परंतु अद्यापही कारवाई झाली नसल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्यास होर्डिंग कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या होर्डिंगवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
वादळी वाऱ्यामुळे वीज वाहिन्यांचे नुकसान होण्याची शक्यता विद्युत महावितरण (ग्रामीण) हडपसर विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी वर्तवली होती. याच पार्श्वभूमीवर महावितरणकडून उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती दिली होती.महावितरणने वर्तवलेली शक्यता खरी ठरली आणि शनिवार सायंकाळी वादळी वारे सुरु झाले. हडपसर महावितरण अंतर्गत परिसरात ठीकठिकाणी विद्युत वाहिन्यांचे व विद्युत खांबांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शनिवारी रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परंतु हडपसर महावितरणची यंत्रणा सज्ज असल्यामुळे वाघोली, केसनंद, लोणीकंद, मांजरी परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे कोरोनाच्या कार्यकाळात ग्राहकांना दिलासा मिळाला. महावितरण हडपसर विभागाचे उपकार्यकारी अभियंता, सहा. शाखा अभियंता गणेश श्रीखंडे, सहा. अभियंता अंकुश मोरे, कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत केला. तसेच वाघोली येथील नगर महामार्गावरील मॅपल हॉटेलजवळील होर्डिंगच्या फ्लेक्स फाटून तारांना गुंडाळल्या गेल्यामुळे रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या होर्डिंगमुळे नागरिकांसह महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विद्युत महावितरणकडून महसूल, पोलीस, ग्रामपंचायतीला विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या होर्डिंग वर कारवाई करावी असे लेखी पत्र दिले होते. परंतु संबधित विभागाने अद्यापही कारवाई होर्डिंगवर केली नाही.
मागील दोन वर्षांपूर्वी नगर महामार्गावरील साई सत्यम पार्क येथील होर्डिंग पत्राच्या टपरीवर कोसळले होते. टपरीजवळ थांबलेले सातजण सुदैवाने बचावले होते. संबधित विभागाने वेळीच होर्डिंगवर कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा विद्युत वाहिन्यांवर होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फोटो ओळ : विद्युत पुरवठा खंडित होण्याला कारणीभूत ठरलेले होर्डिंग.