पुणे : नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शनिवारी १२८९ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. मात्र त्यामध्ये मुदतपूर्व बदली व प्रशासकीय बदली झालेल्या काही नाराज पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली बदली रद्द व्हावी, यासाठी सोमवारी पोलीस आयुक्तालयात एकच गर्दी केली होती. शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी दाद मागण्यासाठी अर्ज घेऊन पोलीस आयुक्तांच्या केबीनबाहेर रांगा लावल्या. कित्येक वर्षानंतर अशाप्रकारे इतक्या मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी थेट आयुक्तांसमोर आल्याने एकच चर्चेचा विषय झाला आहे. पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्तालय व अन्य विभागांमध्ये ६ वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी करणाऱ्या पोलिसांची, तसेच विनंती अर्ज व ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत, अशा पोलिसांच्या पोलीस प्रशासनाकडून बदल्या केल्या जातात. गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर १२८९ पोलिसांच्या बदल्यांचा आदेश काढला. या बदल्यामध्ये पोलीस हवालदार ४७६, सहायक फौजदार ६२, पोलीस नाईक ३२३, पोलीस शिपाई ४०८ यांचा समावेश आहे. मुदतपूर्व व प्रशासकीय बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही बदली रद्द करावी, यासाठी सोमवारी सकाळपासून पोलीस आयुक्तालयात एकच गर्दी केली होती. या सर्वांचे म्हणणे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आणि अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी ऐकून घेतले. त्यात प्रामुख्याने अनेकांनी बदलीचे ठिकाण लांब आहे. वैद्यकीय कारणामुळे बदलीच्या ठिकाणी हजर होणे गैरसोयीचे असल्याची कारणे सांगितली. मंगळवारीही काही कर्मचारी येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.़़़़़़़़़या नियमानुसारच बदल्या करण्यात आलेल्या आहेत़ त्यापैकी काही जण नाराज असणार आहेत. काहीचे डिफॉल्ट रिपोर्ट नुसार बदली झाली आहे. ज्या पोलिसांचे खरेच महत्वाचे कारण आहे. त्यांचा विचार केला जाईल. त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. अन्यथा इतरांना बदलीच्या ठिकाणी जावेच लागेल. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे़.
पुणे पोलीस दलात बदल्यांवरून 'नाराजीनाट्य'; आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी कर्मचाऱ्यांची रांग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 9:30 PM
शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी दाद मागण्यासाठी अर्ज घेऊन पोलीस आयुक्तांच्या केबीनबाहेर रांगा लावल्या.
ठळक मुद्देइतक्या मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी थेट आयुक्तांसमोर आल्याने एकच चर्चेचा विषय