पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना उपनगरांमध्ये का करीत नाहीत. कोविड केअर सेंटर्समध्ये पाणी नाही, स्वच्छतेचा प्रश्न आहेत. अधिकारी फक्त फोटोसेशनसाठी येतात का असा प्रश्न उपस्थित करीत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न मंगळवारच्या मुख्यसभेमध्ये केला.नगरसेवक योगेश ससाणे यांनी हडपसर मध्ये 2200 रुग्ण झाले असून तीन विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकी एका सेंटरवर कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. परंतु, अद्याव एकही वरिष्ठ अधिकारी तिकडे फिरकला नाही. हडपसर नक्की पुण्यातच आहे ना? असा प्रश्न ससाणे यांनी व्यक्त केला.तर अविनाश बागवे यांनी खासगी रुग्णालयांच्या मनमानी बिल आकारणीकडे लक्ष वेधले. खासगी रुग्णालये रुग्णांकडून पैसे उकळत आहेत. त्यांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला.डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, राज्य सरकारने पाठविलेल्या परिपत्रकाचा दाखला देत सात ते आठ हजार रुपये रुग्णालयांकडून वसूल केले जात आहेत. हे परिपत्रक रद्द करण्याची शिफारस पालिकेने करावी.ऑनलाईन सहभागी झालेले भाजपाचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले म्हणाले, कोविडच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये. महापौर प्रशासनाला योग्य त्या सूचना देतील आणि समस्यांमधून मार्ग काढतील.महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नगरसेवकांच्या समस्या समजावून घेत प्रशासनाला गांभीयार्ने काम करायच्या सूचना केल्या. सभासदांचे म्हणणे वास्तव आहे. नागरिकांची परवड होत आहे. त्यांना त्रास होतोय. लोकांचा नगरसेवकांशी थेट संपर्क असल्याने लोक त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडतात. नगरसेवकांनी सूचना लेखी स्वरूपात द्याव्यात. प्रशासनाची नागरिकांशी समन्वय साधण्याची यंत्रणा अपुरी आहे. प्रशासनाने स्वाब तपासणी, विलगीकरण बेड, बिले याबाबत खूप प्रश्न आहेत. त्यावर गांभीर्याने मार्ग काढा. अधिकाऱ्यांनी नगरसेवकांचे फोन घ्यावेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जावे. कोविड केअर सेंटर्सवर असलेल्या समस्यांबाबत अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक घेऊन मार्ग काढू असे महापौर म्हणाले. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वजण जनतेमध्ये जाऊन काम करताहेत. सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन महापौरांनी केले.
पुणे शहरातील ‘कोविड केअर सेंटर्स’मधील असुविधांवरून मुख्यसभेत सभासदांकडून प्रशासन धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 9:48 PM
कोविडच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये
ठळक मुद्देनगरसेवकांचे म्हणणे ऐकून गांभीर्याने उपाययोजना करण्याच्या महापौरांच्या सूचना