वरवंड : जागोजागी साचलेले पाणी, कचऱ्याचे साम्राज्य तसेच दवाखान्याच्या आवारात जनावरांचा असणारा वावर यामुळे हातवळण येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचेच आरोग्य धोक्यात आले होते. यामुळे दुसरीकडे दवाखान्याची इमारत बांधण्यात आली. या इमारतीचीही हीच अवस्था असल्याने येथील आरोग्यसेवेला ग्रहण लागले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हातवळण (ता. दौंड) येथील ग्रामस्थांना त्वरित सेवा मिळावी या हेतूने या ठिकाणी आरोग्य उपकेंद्राची इमारात उभारण्यात आली. सुसज्ज असलेल्या या उपकेंद्राची देखभालीअभावी दुरवस्था झाली. जागोजागी साचलेले पाणी, कचरा तसेच आवारात जनावरांचा असलेला वावर यामुळे येथे येणाऱ्या ग्रामस्थांचेच आरोग्य धोक्यात आले होते. पावसाळ्यात या इमारतीत पाणी साचत असल्याने तसेच या ठिकाणी योग्य सेवा मिळत नसल्याने हे उपकेंद्र ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सुरू करण्यात आले. दरम्यानच्या काळात या केंद्रासाठी पुन्हा दुसऱ्या जागी इमारात बांधण्यात आली. या इमारतीची अवस्थाही काही दिवसांत जुन्या इमारतीसारखी झाली. या उपकेंद्राच्या बाहेर वाहने लावणे, कचरा टाकण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे येथे आरोग्य सेवेसाठी येणाऱ्या नागरिकांचेच आरोग्य धोक्यात आले आहे.
हातवळण उपकेंद्राला अस्वच्छतेचा विळखा
By admin | Published: October 10, 2015 5:05 AM