राजू इनामदार, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी मंडईत लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. काही वेळाने ग्रामदैवत कसबा गणपती पालखीत विराजमान होऊन तिथे आले. पवार व अन्य राजकीय नेत्यांनी श्रीगणेशाचे पूजन केले व शहराचे वैभव असलेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीस उत्साह व जल्लोषात सुरूवात झाली.
भाविक गुलाल उधळत व ढोल वाजवत उत्साहात पुढे गेले व मागे लोकमान्यांच्या साक्षीने राजकीय चर्चा रंगली. अजित पवार, केंद्रीय सहकार व नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र धंगेकर,माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, अनंत गाडगीळ माजी महापौर अंकूश काकडे, कमल व्यवहारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी चे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख व काही राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कसब्याची पालखी येण्याआधीच पवार यांच्याह काही नेतेंमंडळी टिळकांच्या पुतळ्याजवळ उपस्थित झाली होती. त्यांच्यात गप्पाही रंगल्या.
पुतळ्याच्या बाजूलाच स्टेज टाकले होते. तिथे ही सर्व मंडळी बसली. अंकूश काकडे यांना अजित पवार आपल्याबरोबर बोलतील की नाही असे वाटत असावे. ते लांबलांब असतानाच अजित पवार यांनी त्यांना जवळ बोलावले व विचारपूस केली. दोघेही बराच वेळ बोलत होते. तिथे बसल्यानंतर पाटील यांनी सांगितल्यावरून एका कार्यकर्त्याने सामोसे आणून सर्वांना दिले ते खातानाही सर्वांमध्ये गप्पा रंगल्या होत्या. अजित पवार मोहोळ यांनी उत्सवात एकत्र येणे ही पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपराच असल्याचे सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने ही मैफल मोडली व सगळे पुढे निघाले.
दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मंडपाजवळ काका हलवाई यांच्याकडेही दरवर्षीप्रमाणे नाष्ट्याचे आयोजन होते, मात्र केंद्रीय मंत्री मोहोळ व चंद्रकांत पाटील येऊन गेल्यानंतर तिथे अजित पवार पोहचले. आल्याआल्या त्यांनी दोघांबद्दल विचारणा केली. त्यावेळी मोहन जोशी म्हणाले कि 'ते येऊन गेले तरी आम्ही आहोत आत्ता तूमच्याबरोबर! त्यातील मर्म ओळखून तिथे हलकीशी खसखस पिकली. अजित पवार यांनी पेढे व फाफडाचा आस्वाद घेतला.
टिळक पुतळ्याजवळ कमल व्यवहारे यांना.सामोसा दिला जात होता, त्यावेळी अजित पवार चंद्रकांत पाटील यांना म्हणाले. त्यांच्याकडे फार लक्ष दिले नाही तरी चालेल, ते तूमचे मतदार नाहीत.त्यावर पाटील यांनी हसतहसत सांगितले, मला कोल्हापूरहुन इथे पाठवले, आता इथून कुठे पाठवले तर काय घ्या, त्यापेक्षा मी सर्वांचीच काळजी घेत असतो.