लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमधील पाणीसाठा ६.७३ टीएमसीपर्यंत खाली आला आहे. यामुळे सध्या महापालिकेच्या वतीने शहराला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याला मातकट वास येत असून, काही भागांत गाळमिश्रित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याला मातकट वास येत असला तरी हे पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.जुलै महिना उजाडला तरी अद्यापही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पावसाची सुरुवात झालेली नाही. यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. या प्रकल्पातील चारही धरणे मिळून आजअखेर ६.७३ टीएमसी म्हणजे २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने आणखी काही दिवस ओढ दिल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. गेल्या काही वर्षांत मॉन्सून पाऊस दिवसेंदिवस लांबत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. परंतु पूर्वपरंपरेनुसार सिंचन विभागाच्या वतीने धरणातील पाणीसाठ्याच्या वापराचे नियोजन १५ जुलैपर्यंतच केले जाते. यामध्ये बदल करून यापुढे किमान १५ आॅगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. यामुळे पाऊस लांबल्याने काही धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. यामुळेच पुणे शहराला गाळमिश्रित पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.याबाबत पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पत्रक काढून सध्या करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याला मातकट वास येत असला तरी हे पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झाल्यावर पुन्हा पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याला वास येतो म्हणून घाबरून जाऊ नये, असे आवाहनदेखील केले आहे.
गाळमिश्रित पाणीपुरवठा
By admin | Published: July 06, 2017 3:47 AM