पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाला अंतर्गत एमबीए अभ्यासक्रम दूरस्थ पद्धतीने सुरू करण्यात आला असून, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या १५ जानेवारीपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.
विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळा अंतर्गत दूरस्थ शिक्षण पद्धतीने एमबीएची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे. प्रथम वर्ष एमबीए प्रवेशासाठी किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दोन वर्षांच्या कामाचा अथवा व्यवसायाचा अनुभव असणारे प्रवेशासाठी पात्र राहतील, असे मुक्त अध्ययन प्रशाळेचे संचालक डॉ. वैभव जाधव स्पष्ट केले. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची माहिती विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, येथे एमबीए प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.