अवैध धंदे करणारा हद्दपार : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
केंदूर : करंदी (ता. शिरूर) या सांसद आदर्श ग्राम गावामध्ये असलेले गावठी दारूधंदे व गावठी दारूभट्ट्या महिला सरपंच सुभद्रा ढोकले, उपसरपंच बबलू ढोकले यांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त करत दारू विक्रेत्यांना दारू विक्री न करण्याचा सल्ला दिला आहे. काही दारूभट्ट्या जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी चाैंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूनिर्मिती करणाऱ्या तसेच दारूविक्री करणाऱ्या फाल्गुन संभाजी भोसले (वय ४०), नीतू प्रतीक राठोड (वय ३४), छाया सुनील राजपूत (वय ३६, तिघे रा. करंदी, ता. शिरूर), संन्याशी बजरंग राजपूत (वय ४५, रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करंदी (ता. शिरूर) येथे काही ठिकाणी अवैधरित्या दारूविक्री तसेच दारूभट्ट्या सुरू होत्या. याची तक्रार यापूर्वी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी यांना करत कारवाईची मागणी केलेली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या विषयांवर चर्चा झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी आपला मोर्चा दारूभट्टी तसेच दारूअड्ड्यावर वळविला. यावेळी सरपंच सुभद्रा ढोकले, उपसरपंच बबलू ढोकले, ग्रामपंचायत सदस्या शोभा दरेकर, सुनीता ढोकले, रेखा खेडकर, सोनाली ढोकले, पांडुरंग ढोकले, शिवाजी दरेकर, संदीप ढोकले, नितीन ढोकले, अंकुश पंचमुख, ग्रामविकास अधिकारी दिलीप पानसरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, गोरक्ष ढोकले, अशोक ढोकले, सचिन दरेकर, बापू दरेकर, सुनील ढोकले, प्रवीण झेंडे, विशाल खरपुडे, बंटी ढोकले, पिंपळे जगतापचे उपसरपंच सागर शितोळे, स्वप्निल शेळके यांसह आदी उपस्थित होते. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी करंदी व पिंपळे जगताप या भागातील दारूभट्ट्या जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करत तेथे आढळून आलेले दारूचे साहित्य व तयार दारू नष्ट करण्यात आली. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे, पोलीस शिपाई प्रफुल्ल सुतार, निखिल रावडे, हेमंत कुंजीर, विकास पाटील, विकास मोरे, रोहिदास पारखे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहे.
फोटो खालील ओळ – करंदी, ता. शिरूर येथील गावठी दारूभट्ट्या तसेच दारूअड्डे उद्ध्वस्त करताना पदाधिकारी.