पुणे: ‘‘परदेशात भारतीयकलांचे विकृतीकरण केले जात आहे. कारण भारतीय संस्कृती विकृत करणे अत्यंत धोकादायक आहे. ते होऊ नये म्हणून आम्ही आयसीसीआर संस्थेकडून प्रयत्न करत आहोत. विकृत मांडणी होऊ नये म्हणून भारतीय म्हणून आपण बोलले पाहिजे,’’ असे भाजपचे नेते व इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन (आयसीसीआर) संस्थेचे डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले.
भारतीय कला परदेशात शिकवली जात आहे. पण ती कला योग्यप्रकारे आणि अस्सल अभिजातच दिली जावी, यासाठी आता इंडियन कल्चर फॉर कल्चरल रिलेशन (आयसीसीआर) संस्था येणाऱ्या काळात अधिमान्यता देणारी संस्था म्हणून काम करणार आहे. परदेशात जे ऑनलाइन-ऑफलाइन प्रशिक्षण देत असतील, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा आणि अधिमान्यता घ्यावी. त्यांची कला तपासून आम्ही त्यांना मान्यता देऊ, जेणेकरून जगभरात अस्सल भारतीय कलाच पोचेल, असे ते म्हणाले.
सहस्त्रुबध्दे म्हणाले,‘‘आयसीसीआरतर्फे पहिल्यांदाच दिल्लीबाहेर हा कार्यक्रम आयोजिला आहे. त्यातून जगभराला भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून मार्गदर्शन केले जाते. आयसीसीआर ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करते. परंतु, काही देशात आता भारतीय संस्कृतीला विकृतीचे रूप दिले जाते आहे. योगाबाबत असे घडले आहे. म्हणून नृत्यात असे होऊ नये म्हणून आम्ही जे परदेशात नृत्याबाबत ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षण देत असतील, त्यांची कला तपासून त्यांना अधिमान्यता देणार आहोत.’’
साहित्यातील नोबेलसाठी प्रयत्न व्हावा
रवींद्र टागोर यांच्या गीतांजलीनंतर ११० वर्षे झाली तरी इतर कोणत्याही साहित्य कृतीला नोबेल पारितोषिक मिळाले नाही. त्याचे एक कारण म्हणजे अनुवाद नीट होत नाही. त्याबाबत संस्था कार्य करणार आहे. कारण भाषा ही महत्त्वाची आहे. त्यातून रोजगारही उपलब्ध होतो. परदेशातील लोकांना त्यांच्या भाषेत आपली संस्कृती पहायची आहे, त्यामुळे त्यासाठी पाठ्यवृत्ती सुरू करत आहोत. त्यासाठी १० भारतीय विद्यार्थी भाषेचा अभ्यास करतील आणि त्यातून ते अनुवाद करतील. दुभाषी मध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ निर्माण व्हायला हवे.
‘द केरला स्टोरी’कडे सिनेमा म्हणून पहावा
देशातील विविधता जपणारी आयसीसीआर संस्था आहे. तर सध्या गाजल असलेल्या ‘द केरला स्टोरी’बाबत देशाची प्रतिमा मलीन होत आहे. यावर संस्था काही करणार का ? असा प्रश्न विचारल्यावर सहस्त्रबुध्दे म्हणाले,‘‘मला तसे वाटत नाही. कारण तो एक सिनेमा आहे आणि त्याला सिनेमासारखेच पहावे. बाकी त्यात आम्ही काय सांगणार. यापूर्वी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट आला होता. त्याला त्या देशाने सिनेमा म्हणून घेतले. तसेच आपणही ‘द केरला स्टोरी’ला सिनेमा म्हणून घ्यावे’’ असे स्पष्टीकरण सहस्त्रबुध्दे यांनी दिले.