लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने, पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांच्यामध्ये प्रचंड पॅनिक निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी पुणे शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी सुमारे ६ हजार रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण केले. रुग्णालयांकडून प्रत्यक्ष २० हजार इंजेक्शनची मागणी आहे. पुढील दोन तीन दिवसांत परिस्थिती नियंत्रणात येईल, असे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले.
रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा व वितरण सुरळीत होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष ११ एप्रिलपासून कार्यान्वित केलेला आहे. या कक्षामध्ये अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी कार्यरत आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शनचा पुण्यात प्राप्त होणारा साठा व त्याचे वितरण या कक्षामार्फत नियंत्रण ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यात असलेल्या कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांच्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप होईल, याकडे लक्ष दिले जात आहे.
सोमवार (दि.१२) रोजी पुणे जिल्हयासाठी एकूण ६००० इंजेक्शनचा पुरवठा सुरु आहे. हा पुरवठा कंपनीच्या डेपो व स्टॉकिस्टमार्फत थेट कोविड हॉस्पिटलला केला जाणार आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत संबंधित हॉस्पिटलमध्ये साठा पोहोच होईल.
या इंजेक्शनचा वापर आवश्यक त्या रुग्णांना आरोग्य विभागाने घालून दिलेल्या निर्देशानुसारच करावा, असे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत. तसेच या इंजेक्शनची मागणी करताना विशिष्ट प्रपत्रातील प्रिस्क्रिप्शन देण्यात यावे, असे आदेश देखील आरोग्य विभागाने दिलेले आहेत.
हॉस्पिटलव्दारे या इंजेक्शनचा वापर आवश्यक त्याच रुग्णांना केला जातो किंवा कसे याबाबत पडताळणीसाठी आठ भरारी पथकांची नेमणूक केलेली आहे. ही पथके संबंधित कोविड रुग्णालयांना तसेच घाऊक औषध विक्रेत्यांना भेटी देऊन त्यांच्याकडील अभिलेखाची पडताळणी करणार आहेत. सर्व कोविड हॉस्पिटलनी व त्याचे संलग्न मेडिकल यांनी त्यांची रेमडेसिविर इंजेक्शन्सची खरेदी व वापर याबाबत माहिती दररोज सायंकाळी ७ वाजता गुगलशीटवर नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठीची लिंक https../forms.gle/7Pj635R87efr241A6 दिली आहे. यासाठी पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महानगर पालिका आरोग्य अधिकाऱ्यांनादेखील सूचना देण्यात आलेल्या आहेत.