कोरोनाच्या महामारीत लाभार्थी १ मे पासून रास्त भाव दुकानाच्या माध्यमातून धान्य मिळण्याची वाट पहात होते. तळेगाव ढमढेरे येथे पाच रेशनिंगची दुकाने असून या दुकानातून फक्त प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय योजनेतील लाभार्थी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून जाहीर केल्यानुसार तळेगाव ढमढेरे येथे धान्य वाटप सुरू आहे
केंद्रशासन व राज्यशासन यांच्या माध्यमातून प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रतिव्यक्तीस गहू ६ किलोप्रमाणे ४६ हजार ६६४ किलो, तर तांदूळ ४ किलोप्रमाणे ३१ हजार ३३२ किलो असे एकूण ७७ हजार ७९६ किलो धान्यवाटपाचे काम सुरू आहे, तर अंत्योदय योजनेतून कुटुंबातील लाभार्थी संख्या ६३२ यांना प्रत्येक कार्डधारकाला राज्य शासनातर्फे गहू २५ किलो, तर तांदूळ १० किलो आणि केंद्र शासनाचा प्रतिव्यक्ती गहू तीन किलो, तांदूळ दोन किलो याप्रमाणे गहू ५ हजार २२१ किलो आणि तांदूळ २ हजार ५९४ असे एकूण ७ हजार ८१५ किलो धान्य वाटपाचे काम सुरू आहे. साधारण ६० टक्के धान्य वाटपाचे काम पूर्ण झाले असून दोन ते तीन दिवसांत मोफत धान्य वाटप पूर्ण केले जाणार असल्याचे रास्तभाव दुकानदार यांनी सांगितले. केसरी कार्डधारकांना मोफत धान्य वाटप सुरू नसल्याने अनेकजण चौकशीसाठी रेशनिंग दुकानाकडे धाव घेत आहेत.
केसरी कार्डधारकांना शासनाच्या माध्यमातून नोव्हेंबर २०२० नंतर अद्यापर्यंत गहू व तांदूळ वाटपासाठी मिळालेला नाही.त्यामुळे केसरी कार्डधारकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेशनिंग दुकानांमध्ये येऊन चौकशी करू नये. केसरी कार्डधारकांना शासनाने धान्य पुरवठा केल्याबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले जाईल.
- दीपक लांडे, शिरूर तालुका रास्तभाव दुकानदार संघटना)