एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव व प्रादेशिक कार्यालय आदिवासी विकास महामंडळ जुन्नर अंतर्गत खावटी अनुदान योजना राबवण्यात आली. यामधून आदिवासी बांधवांच्या वैयक्तिक खात्यावर रोख रक्कम दोन हजार टाकण्यात आली तर दोन हजार रुपयांचे अन्नधान्य वाटप स्वरूपात देण्यात येणार होते. या अन्नधान्याच्या वाटपाची कोटमदरा येथून सुरुवात करण्यात आली.
किट वाटप कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, कार्यालय अधिक्षक योगेश खंदारे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ भवारी, कोळवाडी कोटमदरा सरपंच मनीषा काळे, कोकणे गुरूजी, प्रकल्प कार्यालयातील संतोष मुनेश्वर, राजाराम गाडेकर, अरुणा घोडेकर, गीतांजली दातीर, सुरेश दुरगुडे, विष्णू साखरे, विपुल टकले, संजय भोजणे, अशोक उदगिरे, प्रसाद लोहकरे, अनिता करंजकर उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत नाईकडे यांनी केले.
घोडेगाव प्रकल्प अंतर्गत येणारे पुणे, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, २४ वसतिगृह यांचे सर्व वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी मार्फत सर्व्हे करून २०८६५ लाभार्थ्यांनी अर्ज भरले. यापैकी निकषांनुसार १३ हजार ८६२ लाभार्थी पात्र ठरून त्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला तर उर्वरित लाभार्थी निश्चित करण्याचे काम सुरू असल्याचे प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या खावटी अनुदान योजनेमुळे आदिवासी बांधवांना मदत झाली. या योजनेमुळे रोजगार नसलेल्या कुटुंबांना शासनाकडून मदत झाल्याचे सभापती संजय गवारी यांनी सांगितले.
१९ घोडेगाव
कोटमदरा येथे खावटी अनुदान योजनेतील अन्नधान्य किटचे वाटप करताना संजय गवारी व इतर.