करोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने आणि लॉकडाऊन झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा म्हणून राज्य सरकारने सुरुवातीला एक महिना धान्य मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. हे धान्य वाटप सुरू झाले आहे. कार्डधारकांना प्रति माणूस तीन किलो गहू व २ किलो तांदूळ तर अंत्योदय कार्डधारकाला २५ किलो गहू व १० किलो तांदूळ मोफत वितरित करण्यात येणार आहे.
अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय योजनेतील कार्डधारकांनाच हे धान्य उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ३७ लाख नागरिकांना लाभ मिळणार आहे. अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या प्रत्येकी दोन रुपये प्रतिकिलो गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. एप्रिल महिन्यात बहुतांश शिधापत्रिकाधारकांनी पैसे देऊन धान्य घेतले आहे. त्यांना या महिन्यातील धान्य मोफत मिळणार आहे.
--
कोट १
तालुक्यात १८८ शासनमान्य दुकाने असून २,९१९ अंत्योदय चे कार्डधारक आहेत त्यांच्या कुटुंबातील १५,७३० लाभार्थीं आहे. प्राधान्य मध्ये ५४ हजार ९१८ कार्डधारक असून २ लाख ८१ हजार १७७ लाभार्थी आहेत. लॉकडाऊन झाल्याने राज्य सरकारच्या निर्णयानुसार तालुक्यातील कार्डधारकांना मोफत धान्य देण्यात येणार आहे.
- जी एस रोकडे, पुरवठा अधिकारी खेड
---
कोट २
गावागावात करोना बाधित वाढले आहेत. ते धान्य घेण्यासाठी कार्डधारकाच्या बोटाचा ठसा घ्यावा लागतो. त्यामुळे करोना संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. प्रत्येक कार्डधारकाच्या पॉईंट ऑफ सेल (पॉस मशीन) वर ठसा घेण्यापेक्षा गावातील पोलीस पाटील, सरपंच अथवा संबंधित दुकानदाराचा ठसा घेऊन कार्ड धारकाला धान्य वितरणास परवानगी मिळणे आवश्यक आहे. सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत धान्य वाटपास परवानगी मिळावी.
- अरुण हलगे ,अध्यक्ष, खेड तालुका रेशन दुकानदार संघटना अध्यक्ष
--