पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या जीवनसाधना गौरव पुरस्काराची घोषणा केली आहे. बुधवारी (दि.१०) ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या उपस्थितीवर मर्यादा घातली आहे.
पुणे विद्यापीठातर्फे ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त उच्च शिक्षण व शैक्षणिक प्रशासन क्षेत्रासाठी माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रासाठी डॉ. प्रशांत हिरे, सांस्कृतिक क्षेत्रासाठी ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, सामाजिक क्षेत्रासाठी साधना झाडबुके, लोकप्रशासन व सार्वजनिक धोरण क्षेत्रातील कामगिरी बद्दल रत्नाकर गायकवाड यांना तर शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी डॉ. न. म. जोशी यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये सकाळी ११ वाजता पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम होणार आहे. कोरोनामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. त्यामुळे जीवनसाधना गौरव पुरस्कारासह विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या इतर शैक्षणिक पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी मर्यादित व्यक्तींना उपस्थित राहता येणार आहे. महाविद्यालय व संस्थांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी पाच प्रतिनिधींना तर व्यक्तिगत पातळीवरील पुरस्कारासाठी पुरस्कारार्थीसह एका व्यक्तीला पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहता येईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट केले आहे.