लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : येथील शासकीय विशेष मुलींचे वसतिगृह चालवणाऱ्या कर्मोलोदया या संस्थेचे अनुदान आजच वितरीत केल्याचे समाज कल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ‘लोकमत’ने आजच संस्थेचे अनुदान रखडल्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते.कर्मोलोदया या संस्थेचे गेले १५ महिन्यांचे अनुदान रखडले आहे. याबाबत आज समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अनुदान आज वितरीत करणार असल्याचे सांगितले. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते संजय पाचंगे यांनीही या विभागाच्या अधिकारी मंजिरी देशपांडे यांच्याशी संपर्क साधला, त्यांनीही यास दुजोरा दिला. गेल्या ४ वर्षांपासून कर्मोलोदया या संस्थेस दरवर्षी अनुदान मिळण्यासाठी खेटा घालाव्या लागत आहेत. याबाबत ‘लोकमत’मध्ये आज वृत्त प्रसिद्ध झाल्यावर अधिकाऱ्यांच्या भूमिकेत सकारात्मक बदल जाणावला. १९ जूनला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशापासून ४ जुलै उजाडला, तरी हेच अधिकारी नकारात्मक वागताना दिसत होते.मुंबई उच्चन्यायालयाने एप्रिलमध्ये स्वत:हून याचिका दाखल करून घेऊन गतिमंद मुले व इतर मुलांच्या बालगृहांना दुप्पट अनुदान द्यावे, असे आदेश दिले आहेत.या प्रकारची बालगृह चालवणाऱ्या संस्थांना आगाऊ अनुदानाची रक्कम देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अशा संस्थांना वेळेवर मानधन मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पाचंगे यांनी केली आहे.
कर्मोलोदया संस्थेचे अनुदान वितरीत
By admin | Published: July 05, 2017 2:55 AM