:लोणारवाडी (ता.दौंड) येथील धगाटे परिवाराने तेराव्याच्या दिवशी वडिलांची आठवण म्हणून तसेच पर्यावरण संवर्धनाची कास धरून उपस्थित पाहुण्यांना केशर जातीच्या आंब्याची रोपे भेट देऊन एक आदर्श उपक्रम राबवला आहे.
लोणारवाडी येथील तुकाराम धगाटे यांचे नुकतेच निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर हिंदू संस्कृतीच्या रितीरिवाजाप्रमाणे मुलाने सर्व विधी करत असताना रोपे वाटप करून वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. वडिलांनी आयुष्यभर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण केले. तर शुद्ध विचारसरणी जोपासण्यासाठी अध्यात्म स्वीकारले होते. त्यांचा हा वसा हाती घेऊन मुलगा महेश धगाटे यांनी वडिलांच्या तेराव्याच्या विधीला पाहुण्यांना रोपे वाटप केली.
याबाबत धगाटे म्हणाले की, वडिलांनी आम्हाला सामाजिक बांधिलकीबरोबर पर्यावरण संवर्धनाची देखील शिकवण दिली आहे. त्यांची शिकवण मी पुढे घेऊन जात हा उपक्रम राबवला आहे. सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येऊन कार्य करणे गरजेचे आहे.