झेप शाळा ही सोलापूर बाजार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूलमध्ये सुरू असून ही शाळा दिव्यांग मुलांच्या शिक्षणाची व त्यांच्या उपचाररासाठी विशेष काम करते. या शाळेत अगदी गरीब पालकांची मुले शिक्षण घेत आहेत. ज्यांचे पालक रिक्षाचालक, घरकाम करण्याचे कष्टाची कामे करत आपल्या दिव्यांग मुलाला शिक्षण, उपचार झाला पाहिजे या उद्देशाने या शाळेत पाठवतात.
आज या मुलांच्या पालकावरही धंदापाणी, बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून झेप शाळेचे मुख्याध्यापक मनीष खंडागळे यांनी पुढाकार घेत आज पटेल रुग्णालयाचे डॉ. निखिल यादव यांच्या मदतीने रॉबिनहूड आर्मी या संस्थेच्यावतीने या पालकांना रेशन किट वाटप केले. त्याचबरोबर, भंगार व कचरा वाचणारे कुटुंब कंत्राटी सफाई कामगार, वॉचमन, काम करणारे कर्मचारी, पटेल रुग्णालयातील परिचारिका, कर्मचारी अशा ९१ कुटुंबीयांना या रेशनकीटचे वाटप करण्यात आले.
गेल्या वर्षी ताळेबंदीच्या दरम्यानदेखील या संस्थेने याचा वर्गाला तीन महिने रेशन किटचे वाटप केले होते. झेप संस्थेच्या या अभिनव उपक्रमाबद्दल लाभार्थींनी विशेष आभार व्यक्त केले. याबद्दल बोर्ड प्रशासनाने देखील आनंद व्यक्त केला आहे.
कोट
आमच्या शाळेत येणारे दिव्यांग मुले ही खूपच गरीब व कष्टकरी परिवारातून येतात, त्यांच्या पालकांचे आपल्या मुलांबद्दल शिक्षणाची आवड हा महत्वाचा मुद्दा असून, त्यांच्या पोटापाण्याचा थोडा फार भार आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. - मनीष खंडागळे, मुख्याध्यापक, झेप
आम्ही नागरिकांकडून मिळालेली मदत गरजू नागरिकांना करतो. मुख्यतः लग्न आणि इतर मंगल सोहळ्यातील शिल्लक राहिलेले अन्न आम्ही मिळवून ते गरजू लोकांना वाटतो. पूर्ण पुण्यात हे काम चालते. आज लॉकडाउनच्या काळात लोकांनी आम्हाला शिधा मदत म्हणून उपलब्ध करून गरजवंतापर्यंत पोहोचवत आहोत.
-प्रदीप रहेजा, रॉबिनहूड आर्मी