लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने ४४ कोटी रूपयांचे वाटप केले. केंद्रीय पथकाने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची नुकतीच पाहणी केली आहे. त्यांच्या अहवालानंतर केंद्र सरकारकडून आणखी ४३ कोटी मिळतील. त्याचेही वाटप करणार आहे.
सप्टेंबर, ऑक्टोबर २०२० मध्ये जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके खराब झाली. अनेकांच्या जमिनीचेही नुकसान झाले. महसूल व जिल्हा कृषी यांच्या वतीने झालेल्या पाहणीनंतर जिल्ह्यात १ लाख ९८ हजार ७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आहे. शेतजमीन खराब झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ३९३ इतकी आहे. एकूण ७८ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावरील पिके या पावसात खराब झाली. त्यातील खरीपातील पिके तर काढणीला आली होती. हातातोंडाला आलेला घास एकदम काढून घेतला गेल्याने शेतकºयांच्या दु:खाला पारावर नव्हता.
कृषी, महसूल विभागाच्या तालुका तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे या नुकसानीची पाहणी केली. पंचनामे तयार केला. मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने ही सर्व आकडेवारी राज्य सरकारला सादर केली. एकूण ८७ कोटी रूपये नुकसानीची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर सरकारकडून प्रत्येकी २ हेक्टरप्रमाणे नुकसानभरपाई दिली जाते. यापूर्वी ती जिरायती पिकाला हेक्टरी ६ हजार ९००, बागायती पिकाला हेक्टरी १३ हजार ५०० व फळ पिकालासाठी १८ हजार रूपये होती. राज्य सरकारने त्यात यावर्षी बदल केला असून आता जिरायती व बागायतीला हेक्टरी १० हजार व फळपिकाला हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले.
राज्य सरकारने त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे दिवाळीनंतर लगेचच ही रक्कम पाठवली. त्यातून महसूल विभागाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४४ कोटी रूपयांचे वाटप केले आहे. केंद्र व राज्य सरकार अशा दोघांकडूनही मदत मिळत असते. केंद्रांकडून मिळणारी रक्कम केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर आता लगेचच जिल्हा प्रशासनाकडे येईल अशी माहिती अधिकाºयांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचे व त्यानंतर भाजीपाला, मका, रब्बी ज्वारी, जिरायती बाजरी, बटाटा, डाळिंब या पिकाचे झाले. पुरंदर तालुक्याचे सर्वात जास्त म्हणजे १५ हजार १९० हेक्टर नुकसान झाले. सर्वात कमी नुकसान वेल्हे तालुक्याचे, ४२३ हेक्टर इतके झाले.