लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यासाठी बुधवारी सुमारे ६ हजार ५३० रेमडेसिविर इंजेक्शन्स व्हायल्स उपलब्ध झाल्या. सध्या दररोज ४ ते ५ हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध होत आहे. जिल्हाधिकारी यांनी रेमडेसिविर इंजेक्शन्सचा गरज असेल तरच वापर करण्याचे व अन्य कडक आदेश दिल्याने मागणी कमी झाली आहे. यामुळेच जिल्ह्यातील रेमडेसिविरचा तुटवडा कमी झाला आहे.
पुणे जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ६५३० रेमडेसिविर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप सोबतच्या यादीप्रमाणे केलेली आहे. कोविड रुग्णालयांनी त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या संख्येप्रमाणे व औषध पुरवठादारनुसार त्यांचेकडून तत्काळ रेमडेसिविर इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने प्राप्त करून घ्यावेत, याबाबत कोणतीही सबब चालणार नाही. कोणत्याही प्रकारची दिरंगाई टाळाटाळ कसूर होणार नाही याची दक्षता रुग्णालय प्रशासन घाऊक विक्रेते यांनी घेणेचे आहे.
संबंधित कोविड रुग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेणेकामी रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्क्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो, ओळखपत्र घाऊक विक्रेत्यांकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय/वाजवी दरात करणेचे आहे.
प्रस्तुत बाबत अशी बाब निदर्शनास आली आहे की, हॉस्पिटलमार्फत रुग्णांचे नातेवाईक यांना रेमडेसिविर इंजेक्शन आणणेबाबत प्रिस्क्रिप्शन देण्यात येते. त्यामुळे रुग्णांचे कुटुंबातील व्यक्तींना अथवा नातेवाईक यांना रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी नाहक धावाधाव करावी लागते. वास्तविक पाहता शासनाकडील आदेशानुसार दिनांक ११ एप्रिल २०२१ पासून रेमडेसिविर इंजेक्शन्सचे वितरण केवळ जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होत असून रेमडेसिविर इंजेक्शन थेट रुग्णालयांनाच उपलब्ध करून देण्यात येत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन इतरत्र मेडिकल्स येथे उपलब्ध नाही. परंतु हॉस्पिटलमार्फत रुग्णांचे नातेवाईक यांना रेमडेसिविर इंजेक्शन आणणेबाबत प्रिस्क्रिप्शन देणेत येत असल्यामुळे सदर इंजेक्शनचा काळाबाजार होण्यास चालना मिळत असलेचे निदर्शनास येत आहे.
रेमडेसिविर आणण्याबाबत प्रिस्क्रिप्शन देऊ नये
या परिपत्रकाद्वारे कळविणेत येत आहे की, कोणत्याही हॉस्पिटलने रुग्णांचे नातेवाईक अथव कुटुंबातील व्यक्ती यांना रेमडेसिविर इंजेक्शन आणण्याबाबत प्रिस्क्रिप्शन देऊ नये. अशी बाब निदर्शनास आलेस संबंधित हॉस्पिटल यांना या कार्यालयामार्फत होणारा रेमडेसिविर इंजेक्शन व्हाइल्सचा पुरवठा तत्काळ गोठविणेबाबत निर्णय कोणतीही पूर्वसूचना न देता घेणेत येईल.