पुणे : जिल्हा प्रशासनाच्यावतीने पेन्शन योजनेची माहिती देण्याकरिता कमला नेहरु रुग्णालयात कुष्ठरुग्णांसाठीचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये दारिद्रय रेषेखालील लोकांसह गरजूंसाठीच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांविषयी तहसीलदार अर्चना यादव यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मोहिमेंतर्गत पुणे शहरातील पात्र लाभार्थी वंचित राहू नये व या योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत कुष्ठरोग्यांनाही पेन्शन दिली जाते. मात्र या योजनेबाबत माहिती नसल्याने त्यांना लाभ मिळत नाही. यावेळी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, वयस्कर महिलांसाठीच्या श्रावणबाळ योजनेसह विविध योजनांचीही माहिती देण्यात आली. या शिबिराचा लाभ ७० कुष्ठरुग्णांनी घेतला. वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक पुणे तसेच आरोग्यसेवा सहायक संचालक यांच्या सहकार्याने संजय गांधी निराधार योजना (पुणे शहर) यांच्या समन्वयाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रुग्णांना उत्पन्नाचे दाखले, रहिवास दाखले आणि प्रतिज्ञापत्रांचे वाटप करण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी कुष्ठरोगी असल्याचे प्रमाणपत्र दिले गेले. पेन्शन योजनेसाठी पात्र असल्याचे अर्ज भरुन घेण्यात आल्याची माहिती यादव यांनी दिली.
पेन्शन योजनेच्या माहितीसाठी जिल्हा प्रशासनाकडून पुणे शहरातील कुष्ठरुग्णांसाठी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 3:18 PM
जिल्हा प्रशासनाच्यावतीने पेन्शन योजनेची माहिती देण्याकरिता कमला नेहरु रुग्णालयात कुष्ठरुग्णांसाठीचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये दारिद्रय रेषेखालील लोकांसह गरजूंसाठीच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांविषयी तहसीलदार अर्चना यादव यांनी मार्गदर्शन केले.
ठळक मुद्देयोजना लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी हाती घेतली विशेष मोहिम ७० कुष्ठरुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ