पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघासाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून जिल्हा प्रशासनाने मतदानासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण केली आहे. या मतदार संघात २ हजार २९६ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. तसेच पुणे व बारामती मतदार संघाप्रमाणे शिरूर लोकसभा मतदार संघातील २३७ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग केले जाणार आहे, असे अपर जिल्हाधिकारी व शिरूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी गुरूवारी सांगितले. महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूका पार पडत असून तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या २९ एप्रिल रोजी होणार असून त्यात पुणे जिल्ह्यातील शिरूर व मावळ लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील एकूण २१ लाख ७३ हजार ५२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदार संघात एकूण १२ हजार ६८५ कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे ७० टक्के मतदारांपर्यंत मतदानासाठी स्लिपांचे वाटप केले आहे. मतदारांची संख्या वाढल्यामुळे ६९ मतदान केंद्र वाढली आहेत. त्यातील ३५ हडपसरमध्ये २० भोसरीत,१२ शिरूरमध्ये तर २ आळंदी परिसरात आहेत. या मतदार संघात ११६ वाहनांना परवाना दिले असून २०६ कोपरा सभांना मंजूरी दिली.जिल्हा प्रशासनातर्फे मतदानाच्या दृष्टीने आवश्यक तयारी पूर्ण केली असून सर्व क्षेत्रीय अधिकारी व इतर अधिकारी, कर्मचाºयांना मतदानासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेवून जाण्यास बंदी आहे. काही मतदारांकडून मतदान प्रक्रियेतील गोपनियतेचा भंग होतो. त्यामुळे मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल घेवून येऊ नये, सर्व मतदारांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन रमेश काळे यांनी केले आहे.निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांपैकी २ हजार ४५ सैनिक मतदारांना आॅनलाईन बॅलेट पेपर पाठविले आहेत. तर ८५४ मतदार पोस्टल मतदान करणार आहेत. त्याचप्रमाणे ३ हजार ४०८ कर्मचाºयांची नियुक्ती त्यांच्याच विधानसभा मतदार संघात झाली आहे. त्यामुळे ईडीएफचा वापर करून हे कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदान करणार आहेत. आत्तापर्यंत २९ लाख ६७ लाख ११६ रोख रक्कम आणि ९ हजार ३३३ लिटर मद्य जप्त केले आहे, असेही काळे म्हणाले.
शिरूर लोकसभा मतदानाची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण : २ हजार २९६ मतदान केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:17 PM
महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूका पार पडत असून तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे.
ठळक मुद्देचौथ्या टप्प्यातील मतदान येत्या २९ एप्रिल रोजी होणार शिरूर लोकसभा मतदार संघातील एकूण २१ लाख ७३ हजार ५२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार