लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात पोस्ट कोविड रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. परंतु वेळेत उपचार मिळाल्यास रुग्ण बरा होतो आहे. यासाठीच जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने म्युकरमायकोसिस आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध, उपचार व नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश दिले आहेत.
रुग्णांना कोरोनानंतर साधारण एक महिन्यापर्यंत म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता असते. मधुमेह असलेले रुग्ण तसेच रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, कॅन्सर बाधित रुग्ण, कोविडसाठी स्टेरॉईडचे उपचार घेणारे रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस गंभीर स्वरूपाचा आजार उद्भवू शकतो. रुग्णाची वेळेत माहिती मिळण्यासाठी ग्रामीण भागातील सर्व आरोग्य यंत्रणेला २७ मेपर्यंत जलद सर्वेक्षणाची एक फेरी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
यादी तयार करणार
जिल्ह्यातील १५ एप्रिलनंतर कोरोना उपचार घेऊन घरी आलेल्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. गावनिहाय समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देऊन म्युकरमायकोसिस रुग्णशोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.