जिल्हा बँकेच्या आचारसंहितेची ऐशीतैशी; थेट व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसवर घेतली मतदारांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 09:42 PM2021-12-13T21:42:22+5:302021-12-13T21:43:01+5:30
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी हवेली तालुक्यातील मतदार असलेले ब ,क आणि ड गटातील मतदारांना दुपारी सर्किट हाऊसवर बोलवण्यात आले होते
पुणे : सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीची एक आचारसंहिता निश्चित असते. परंतु सध्या जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत मंत्री, आमदार असलेल्या संचालकांकडून सर्व आचारसंहिताच पायदळी तुडवली जात आहे. बँकेच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या राज्यमंत्र्यांनी सोमवारी चक्क सरकारी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसवरच मतदारांची बैठक घेतली. तर अन्य उमेदवार असलेल्या आमदार विद्यमान संचालकांकडून देखील निवडणूक प्रचारासाठी सर्रास शासकीय यंत्रणेचा वापर केला जात आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी हवेली तालुक्यातील मतदार असलेले ब ,क आणि ड गटातील मतदारांना दुपारी सर्किट हाऊसवर बोलवण्यात आले होते. या मतदारांना राज्यमंत्री यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, यांच्या सह तालुक्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक प्राधिकरण कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.