पुणे: जिल्ह्यात मतदार नाव नोंदणी अभियान, छायाचित्र नसलेले मतदार, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रियां व तृतीय पंथी मतदार होण्यासाठी घेतलेली विशेष मोहीम, मतदार जनजागृती अभियानामध्ये केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी हा सन्मान घोषित केला.
जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख दर गुरुवारी बैठक घेऊन निवडणूक कामांचा नियमित आढावा घेतात. पुणे जिल्ह्यात 1 जानेवारी ते 5 डिसेंबर 2021 या कालावधी मध्ये एकुण 1223413 फॉर्म प्राप्त झालेले होते. यापैकी 1223401 फॉर्मवर अंतिम निर्णय घेण्याची कार्यवाही पुर्ण झाली आहे. त्यामुळे या मोहिमे अंतर्गत जिल्हयात तब्बल 2 लाख 70 हजार 665 इतक्या नवीन मतदारांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षीच्या अंतिम मतदार यादीत 37,59,289 महिला मतदारांच्या तुलनेत यावर्षी प्रारुप मतदार यादीमध्ये 1,17,959 व अंतिम मतदार यादीमध्ये 1,48,151 महिला मतदारांची नोंदणी झालेली आहे. अंतिम मतदार यादीमध्ये 38,85,676 इतक्या महिला मतदार आहेत.
दरम्यान पुणे जिल्हयाच्या मतदार यादीमध्ये लाखो मतदार छायाचित्र नसलेले मतदार होते. यासाठी देखील विशेष मोहिम घेऊन मोठ्याप्रमाणात छायाचित्र गोळा करण्यात आली. देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रियां व तृतीय पंथी यांच्यासाठी कार्यरत असलेल्या स्वंयसेवी संस्थाच्या बैठकीच्या माध्यमातून जनजागृती करुन नोंदणी वाढविण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात आले. त्यांना मतदार नोंदणी व मतदान विषयक त्यांच्या हक्कांविषयी जागृत करण्यात आले. तसेच, मतदार संघस्तरावरुन विशेष मोहिमेच्या कालावधी मध्ये देह व्यवसाय करणा-या स्त्रियां व तृतीय पंथी यांचेकरिता जनजागरुकता कार्यक्रमाचे आयोजन केले.