बारामती : मागील महिन्यात काही समाजकंटकांनी केलेल्या हल्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी उद्योगांचे मोठे नुकसान झाले. विशेषत: चाकण परिसरात त्याची अधिक झळ पोहचली. त्यामुळे धास्तावलेल्या जिल्ह्यातील उद्योजकांनी सुरक्षिततेसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच राखी बांधून रक्षाबंधनाच्या अनोख्या बंधात गुंफले. भावाचे नाते जोडून आमचे असुरक्षितततेच्या वातावरणात संरक्षण करा, असे साकडे यावेळी उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या बंधनाशी बांधिलकी जपत उद्योजकांचे सुरक्षिततेसह विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पुणे जिल्ह्यातील उद्योजकांची झुम ही औद्योगिक संघटना आहे. या संघटनेचे जिल्हाधिकारी स्वत: अध्यक्ष आहेत. प्रत्येक दोन, तीन महिन्यामधून एकदा संघटनेची बैठक होते. काही दिवसांपुर्वी संघटनेची बैठक पार पडली. यासाठी अतिरीक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी संजीव देशमुख आदी उपस्थित होते. एमआयडीसीतील रस्ता, खड्डे, जागा, पोलीस स्टेशन, रुग्णालय, आरोग्य योजना आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.त्यानंतर पुणे जिल्हा औद्योगिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पानसरे, उपाध्यक्ष नंदकिशोर जगदाळे, कोषाध्यक्ष प्रदीप सपकाळ, बारामती चेंंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार, फेडरेशन आॅफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल, खजिनदार विनोद जैन आदींनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेतली.औरंगाबाद, चाकण येथे मागील महिन्यात आंदोलनाच्या वेळी काही समाजकंटकांनी हल्ले केले. त्यामध्ये उद्योगांचे मोठे नुकसान झाले. या घटनांमुळे उद्योग विश्वात अद्याप भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे भाऊ म्हणून पाठराखे बनून उद्योगांचे, आमचे संरक्षण करा असे साकडे घालण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी या नात्याची जाण ठेवत चाकण एमआयडीसीत भेट देउन तेथे बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तेथील पोलीस स्टेशनला मंजुरी मिळाली असून जागेच्या प्रश्नासह सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.दरम्यान, बारामती येथील एमआयडीसीमध्ये अनेक ठीकाणी बीएसएनएलची ह्यलॅण्डलाईनह्य अनेक ठिकाणी पोहचलेली नाही. केबल अभावी ही सेवा अद्याप अनेक उद्योगांना मिळालेली नाही. त्यामुळे इंटरनेटची सेवा मिळण्यास अडचणी येतात. उद्योगांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, अशी समस्या या बैठकीत मांडल्याचे कुंभार यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. पुढील बैठकीत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना सांगून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अतिरीक्त जिल्हाधिकारी काळे यांनी दिल्याचे कुंभार म्हणाले.
उद्योजकांनी सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनाच रक्षाबंधनात गुंफले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 9:22 PM
भावाचे नाते जोडून आमचे असुरक्षितततेच्या वातावरणात संरक्षण करा, असे साकडे यावेळी उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले.
ठळक मुद्दे मागील महिन्यात काही समाजकंटकांनी केलेल्या हल्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी उद्योगांचे मोठे नुकसान