भिगवण : जिल्हा परिषद शाळा तक्रारवाडीने (ता. इंदापूर) ६० वर्षे पूर्ण करीत ६१व्या वर्षात पदार्पण केल्याने शाळेचे शिक्षक आणि ग्रामस्थांकडून शाळेचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. जिल्ह्यात आदर्श असणाऱ्या शाळेचा वाढदिवसानिमित्त केक कापून लहान मुलांना जिलेबी आणि चॉकलेट खाऊचे वाटप करण्यात आले.ब्रिटिश राजवटीत सुरू झालेल्या या शाळेचे अधिकार जिल्हा परिषदेकडे येण्याअगोदर जिल्हा लोकल बोर्ड स्कूल कमिटीकडे होते. १९५६ साली आलेल्या महापुरात या शाळेची सर्व कागदपत्रे पाण्यात वाहून गेली असल्याचे शाळेत शिकणाऱ्या शेकलाल मुलानी यांनी सांगितले. ९ सप्टेंबर १९५६ साली हि शाळा जिल्हा परिषदेच्या अधिकाराखाली आली. या वेळी पहिली ते चौथी असे वर्ग भरविले जात होते. त्या वेळची शाळा ही उजनी धरणात गेलेल्या जुन्या तक्रारवाडी या गावात भरत होती. त्यानंतर उजनी धरणासाठी गावाची जागा गेल्याने १९७७ साली नवीन जागी शाळेचे स्थलांतर करण्यात आले. त्या वेळी पाचवीच्या वर्गाला परवानगी देण्यात आली. सरपंच शोभा वाघ आणि उपसरपंच प्रशांत वाघ यांनी लहान विद्यार्थ्यांसमवेत केक कापून शाळेला शुभेच्छा दिल्या. या वेळी शाळेत शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. या शाळेचा पट २००९ सालापासून टिकवून ठेवण्यात शाळेला यश मिळाले आहे. आजच्या खासगी शाळांच्या काळातसुध्दा शाळेचा पट ४००च्या घरात आहे.
जिल्हा परिषदेच्या तक्रारवाडी शाळेला ६० वर्षे पूर्ण
By admin | Published: September 12, 2016 2:17 AM