पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने पुण्यातील सर्व न्यायालयांतील कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सर्व न्यायालयांतील कामकाजाबाबत नवी नियमावली लागू केली आहे. या नव्या नियमानुसार न्यायालयातील कामकाज सकाळी साडेदहा ते दुपारी १ आणि दुपारी दीड ते सायंकाळी ४ अशा दोन शिफ्टमध्ये सुरु राहणार आहे. या कालावधीमध्ये ज्या प्रकरणाची सुनावणी आहे, अशा वकील व पक्षकारांनाच न्यायालयात प्रवेश देण्यात येणार आहे. ही नवी नियमावली ९ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.
न्यायालयात सध्या दररोज हजारोच्या संख्येने पक्षकार, वकील येत असतात, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.
न्यायालयीन कामकाज करताना वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी हजर नसतील तर त्यांच्याविरुद्ध आदेश पारित केला जाणार नाही. न्यायालयीन कामकाजांच्या दैनंदिन बोर्डावर मोजक्याच कामांचा उल्लेख करण्यात येणार आहे. बोर्डावर उल्लेख केलेल्या खटल्यांचे कामकाज त्या दिवशी चालेल. जोपर्यंत नाव पुकारले जात नाही, तोपर्यंत न्यायालयीन कक्षामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.
....
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता न्यायालयात येणाऱ्या वकील, पक्षकारांनी खबरदारी घेतली पाहिजे़ न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर तत्काळ आवारातून बाहेर पडावे. नवी नियमावली ९ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
अॅड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशऩ