पुणे : सध्या जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने ठप्प झालेल्या प्रशासकीय कामांना पुन्हा वेग आला आहे. यामुळेच येत्या बुधवार (दि. २५) रोजी जिल्ह्यात फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या फेरफार अदालतमध्ये ३ हजार २६९ नोंदी निकाली काढण्यात आल्या होत्या.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे महसूल कामांवर चांगलाच परिणाम झाला आहे. यामुळेच महसूल विभागाच्या प्रलंबित नोंदीची संख्या देखील वाढत आहे. जिल्ह्यात अद्यापही तब्बल तेरा हजारपेक्षा अधिक नोंदी प्रलंबित असून, या नोंदी निकाली काढण्यासाठी दर महिन्याला जिल्ह्यात सर्व सर्कल व तालुकास्तरावर फेरफार अदालत आयोजित केली जात आहे. जिल्ह्यात प्रलंबित नोंदीमध्ये प्रामुख्याने साध्या वारस तक्रार व मुदत पुर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निकाली काढण्याच्या सूचना संबंधित कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. फेरफार अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निकाली काढण्यात येणार आहेत. सर्व तलाठी, सर्कल अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी यांनी फेरफार अदालतीसाठी उपस्थित राहून जास्तीत जास्त नोंदी मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.