पुणे : पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा शनिवारी (दि.३) पहाटे मृत्यू झाला. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणारी दोन मुले आहेत. त्यांचा एक मुलगा परदेशी शिकत असून तो पुण्यात परतल्यानंतर सरग यांच्या पार्थिवावर कोरोना साथीचे नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सरग यांना गेल्या आठवड्यात कार्यालयात असतानाच त्रास होऊ लागल्याने कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यावर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांतच त्याची प्रकृती प्रचंड खालावल्याने त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ससूनमध्ये शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांना चांगले उपचार मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी प्रयत्न केले होते. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
मनमिळावू, हसतमुख अधिकारी म्हणून माध्यम क्षेत्र व प्रशासकीय क्षेत्रात त्यांचा नावलौकिक होता. सरग यांचा माध्यम क्षेत्रात दांडगा संपर्क होता. सरकारी नोकरीत असतानाही व्यंग्यचित्रकार म्हणून असलेली कला सरग यांनी जपली होती. राज्यभरच्या अनेक नियताकालिकांमधून त्यांची हजारो व्यंग्यचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अवघ्या पंधरा दिवसांनी त्यांना बढती मिळणार होती. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने माहिती खात्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.