बारामती : राज्यातील प्राथमिक शिक्षकांची ३० जूननंतर जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु करणार असल्याची माहिती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट ) राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बदली पोर्टल सुरु करण्याबाबत मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली.
बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या आॅनलाईन पद्धतीने करणेसाठी शासनाने दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी बदलीचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. त्यासंदभार्तील सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.
बदली धोरणानुसार जिल्हा अंतर्गत बदल्या ३१ मे पर्यंत होणे बंधनकारक आहे. परंतु यावर्षी कोरोना संसगार्मुळे ३० जून पर्यंत कोणत्याही प्रकारच्या बदल्या करू नयेत ,असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे स्वतालुक्यात येऊ इच्छिणाऱ्या अनेक शिक्षकांची गैरसोय व निराशा झाली होती.परंतु आज रोजी कोरोना प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झालेली आहे.याच पार्श्वभूमीवर शिक्षक बदली पोर्टल सुरु करून प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरु करावी.
बदलीसाठीची सेवेची अंतिम तारीख ३१ मे ऐवजी ३० जून करावी, संवर्ग ४ मध्ये समाविष्ट शिक्षकांना एका शाळेवर ३ वर्षे सेवा पूर्ण झाली असल्यास विनंती बदलीसाठी पात्र समजण्यात यावे. यासंदर्भात शासनाने लवकरात लवकर शुद्धीपत्रक काढावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (कै.शिवाजीराव पाटील गट) यांच्यावतीने करण्यात आली.याबाबत लवकरच शुद्धीपत्रक काढू असे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.———बदलीसाठी धरावयाच्या सेवेची अंतिम तारीख ३१ मे ऐवजी ३० जून केल्यास २०१८ व १९ मध्ये विस्थापित होऊन पर तालुक्यात बदलून गेलेल्या शिक्षकांना स्व तालुक्यात येण्यासाठी लाभदायी ठरेल.एका शाळेवर तीन वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्वच संवर्गातील शिक्षकांना विनंती बदलीची संधी मिळावी.
- केशवराव जाधव, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.