बारामती: जिल्ह्यातील सन २०२०-२१ च्या रब्बी हंगाम जिल्हास्तरीय पीक स्पर्धेत हरभऱ्याचे हेक्टरी ३४ क्विंटल उच्चांकी उत्पादन बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथील महिला शेतकऱ्याने घेतले आहे. छाया तानाजी पवार असे या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी सर्वसाधारण गटातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. कृषिदिनी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी दिली.
पवार यांनी हरभरा पिकाचे हेक्टरी ३४ क्विंटल उच्चांकी उत्पादन घेऊन जिल्ह्यात रब्बी हंगाम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. कृषिदिनी पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. बारामती तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी तानाजी पवार यांच्या त्या पत्नी आहेत. या पीक स्पर्धेत हरभरा पिकामध्ये भरघोस उत्पादन घेण्यासाठी त्यांना उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तालुका कृषी अधिकारी दतात्रय पडवळ यांनी मार्गदर्शन केले. महिला शेतकरी छाया पवार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
उच्चांकी उत्पादन घेतल्याबद्दल बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथील महिला शेतकरी छाया तानाजी पवार यांचा गौरव करण्यात आला.
०२०७२०२१ बारामती—०१