राजगुरूनगर (पुणे) : पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे व खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे माझ्या कामात नाहक हस्तक्षेप करून मला त्रास देत आहेत. वारंवार चौकशा आणि दबाव आणला जात आहे, असे लेखी तक्रारीचे पत्र खेडचे प्रांतधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे. तक्रारीत हे गंभीर आरोप करण्यात आले आहे.
सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त, पीएमआरडीएचे संचालक अशा विविध पदांवर काम केले आहे. खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे म्हणाले, सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमीन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना २८ मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला. तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळातही चौकशी समित्या नेमुन निवडणूक अधिकारी म्हणुन त्यात गुंतवून ठेवण्यात आले. याबाबतचा खुलासा मुख्य निवडणुक आयोगाला पत्राद्वारे केला आहे.
"...तर आत्महत्या करणार"-
दरम्यान, या प्रकरणामुळे आपल्यावर मानसिक ताण राहिला. या सर्व बाबींचा उल्लेख करून त्याची चौकशी होऊन या प्रकरणाला वाचा फोडली नाही तर उद्या आपण आत्महत्येचा स्पष्ट उल्लेख करून तसे पत्र खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी मुख्य निवडणुक आयुक्त तसेच महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव यांना दिले आहे.
रिंगरोड प्रकल्पात पैसा लुटला -
याप्रकरणी खेडचे आमदार दिलिप मोहिते पाटील म्हणाले, जोगेंद्र कट्यारे हा अधिकारी मुळातच भ्रष्ट आहे. मानसिक रुग्ण आहे. त्याने यापूर्वी ज्या ठिकाणी काम करीत होते तेथेही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यावेळी देखील त्याने आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. भ्रष्टाचार करून तो उघड होऊ लागल्यावर असे पांघरून घालायचे त्याचे प्रयत्न असतात. त्यांनी खेड तालुक्यातील पुणे रिंगरोड प्रकल्पात शेतकऱ्यांना पैसे वाटप करताना मोठा पैसा लुटला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्या. तो आमदार म्हणुन माझा अधिकार आहे. खेडला बदलीसाठी कोट्यावधींची माया कुणाला व का दिली याचीही चौकशी शासकीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून व्हावी. मी देखील विधानसभेत आवाज उठवून विधान भवनासमोर उपोषण आंदोलन करणार आहे, असं मोहिते पाटील म्हणाले.