लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील ५ ते ८ वीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याच्या सूचना राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिल्या. पुणे जिल्ह्यातील ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरू करण्याची तयारी जिल्हा परिषदेने केली आहे. यातील काही शाळा पालकांच्या परवानगीने सुरू करण्यात आल्या आहेत. उर्वरीत शाळा सुरू करण्यासाठीचीही तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.
जिल्ह्यात ९ वी ते १२ वीच्या माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळाला. या शाळेतील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करून त्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. त्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला विद्यार्थ्यांची उपस्थिती मोजक्या स्वरूपात होती. त्यानंतर हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढली. मात्र, अद्यापही कोरोनाच्या धास्तीने काही पालक पाल्यांना शाळेत पाठवण्यास धजावत नव्हते. असे असले तरी ९ वी ते१२ वीच्या सर्व शाळा सुरळीत सुरू झाल्या होत्या. शुक्रवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ५ ते ८ वी च्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील काही शाळा या पालकांच्या संमतीने सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनाही कल्पना देण्यात आली आहे.
उर्वरीत शाळा सुरू करण्यासाठी ही जिल्हा परिषदेची पूर्ण तयारी आहे. ९ ते १२ वी च्या शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे अनिवार्य हाेते. मात्र, पुरंदर तालुक्यात एक शिक्षक आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र, जिल्ह्यात शनिवारपासून आरोग्य सेवकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेत शिक्षकांचेही लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांच्याकडे केली असल्याचे शिवतरे यांनी सांगितले आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यास शिक्षकांचेही लसीकरण करून शाळा सुरू करता येईल असेही ते म्हणाले.