पुणे : जिल्ह्यात लसीकरण मोहीम ही लसींच्या तुटवड्याअभावी रखडली होती. यामुळे अनेक केंद्रे बंद पडले होते, तर लसीकरण सुरू असलेल्या काही केंद्रांवरून लस कमी असल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागले होते. मात्र, गुरुवारी जिल्ह्यासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे ८८ हजार ३६० नवीन लसीचे डोस देण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून हे डोस सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग येणार आहे. ग्रामीण, नगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डातील लसीकरणासाठी ही लस वितरित केली जाणार आहे.
जिल्ह्यात लसीच्या डोसची कमतरता असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली होती. लसींचा पुरवठा कमी होत असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. तर, प्राधान्याने दुसरा डोस देण्याचे आदेश प्रशासनाने आरोग्य विभागाला दिले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या केंद्रावर दिवसाला ९० हजार लसीकरण करता येईल अशी क्षमता आहे. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे ही केंद्रं पूर्ण क्षमतेने सुरू नव्हती. यामुळे लसींंचा जास्तीत जास्त पुरवठा व्हावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली होती. अखेर गुरुवारी कोविशिल्ड
लसीचे ७९ हजार ३५० डोस आणि कोव्हॅक्सिन लसीचे ९ हजार १० डोस जिल्ह्याला मिळाले. या डोसमुळे काही प्रमाणात लसींचा तुटवडा भरून निघणार आहे. यासोबतच बंद झालेली केंद्रे पुन्हा सुरू होऊन रखडलेल्या लसीकरण मोहिमेला पुन्हा गती मिळणार आहे.
राज्यात १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातही याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात १४ केंद्रांवर याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, लसीचा तुटवड्यामुळे हे लसीकरण थांबवण्यात आले आहे. केवळ आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि दुसरा डोससाठीच सध्या लसीकरण सुरू आहे.
चौकट
शहर पिंपरीच्या तुलनेत ग्रामीणभागात लसींचा कमी पुरवठा
ग्रामीण भागात जवळपास ५० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. ग्रामीण भागात रोज ९० हजार लसीकरण करण्याची क्षमता आहे. मात्र, लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने पूर्ण क्षमतेने लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबविता येत नाही. जिल्ह्याला मिळालेल्या लसींचे समप्रमाणात वितरण होणे गरजेचे आहे. मात्र, पिंपरी आणि पुण्याच्या तुलनेत ग्रामीण भागाला जवळपास ३० टक्के लसी कमी मिळाल्या आहे. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती.
तालुकानिहाय लसीचे वितरण
आंबेगाव - ३१६०, बारामती - ५२८०, भोर - १६२०, दौंड - ४७१०, हवेली - ११८०, इंदापूर - ३४६० जुन्नर - ४७४०, खेड - २७९०, मावळ - ३३९०, मुळशी - १८८०, पुरंदर - ४०६०, शिरूर -३०३०, वेल्हा - १६६०, कॅन्टोन्मेंट - ९००
लसीकरण साठवण केंद्रात ४६ हजार ५०० लस
तालुक्यांना सध्या दिलेल्या लक्ष्यानुसार त्यांना लसींचे वितरण करण्यात आले आहे. गुरुवारी आलेल्या निम्म्या लसींचे वितरण करण्यात आले आहे. तर, ४६ हजार ५०० लसी या जिल्हा लसीकरण साठवण केंद्रात ठेवण्यात आल्या आहेत. गरजेनुसार टप्प्याटप्प्याने या लसींचे वितरण ग्रामीण भागातील केंद्रांना करण्यात येणार आहे.