लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून लसींचा अपूरा पुरवठा होत होता. याचा लसीकरणावर परिणाम झाला होता. मात्र, गुरुवारी पहिल्यांदाच सव्वा दोन लाखांहून अधिक लसींचे डोस मिळाले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा १ लाख २० हजार २६० लसींचे डोस प्राप्त झाले. यात कोव्हॅक्सीनचे ५ हजार २६० तर कोविशिल्डचे १ लाख १५ हजार डोस उपलब्ध झाले. यामुळे मंदावलेल्या लसीकरणाला वेग येणार आहे.
लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गेल्या काही दिवसांपासू जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग मंदावला होता. लोकसंख्येच्या तुलनेत लसींचे डोस मिळावे, अशी मागणी वारंवार केली जात होती. अखेर गुरुवारी जिल्ह्याला पहिल्यांदाच सव्वादोन लाखांहून अधिक लसींचा पुरवठा झाला होता. यामध्ये २ लाख १२ हजार कोविशिल्ड आणि १४ हजार ४०० कोव्हॅक्सिन लसींचा समावेश होता. यामुळे मंदावलेल्या लसीकरणाला वेग आला होता. दोन दिवसांनंतर शनिवारी (दि.१४) पुन्हा जिल्ह्याला १ लाख २० हजार २६० लस प्राप्त झाल्याने लसीकरण मोहीम वेगाने राबविता येणार आहे. शनिवारी कोव्हॅक्सिनचे ग्रामीण भागाला ३ हजार, पुणे शहरासाठी १ हजार २६०, तर पिंपरी-चिंचवडसाठी १ हजार लस प्राप्त झाल्या. तर कोविशिल्डच्या पुणे ग्रामीणसाठी ५० हजार डोस, पुणे शहरासाठी ४० हजार, तर पिंपरी चिंचवडसाठी २५ हजार डोस मिळाले. दोन्ही मिळून १ लाख २० हजार २६० लसींचे डोस मिळाले. कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. तिसरी लाट रोखण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. लसींचा पुरवठा योग्य पद्धतीने झाल्यास लसीकरण वाढवणेही शक्य होणार आहे. याच दृष्टीने लसींचा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात सध्या एका दिवशी ५० ते ६० हजार लसीकरण केले जात आहे. आजपर्यंत पाच वेळा जिल्ह्यातील लसीकरण एक लाखाहून जास्त झाले आहे.