लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे जिल्हा शिक्षक संघाने जिल्ह्यातील बदली प्रक्रियेविरोधात १ हजार ९१४ शिक्षकांची वैयक्तिक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना २४ मे रोजी न्यायालयाने १ हजार ९१४ शिक्षकांना वैयक्तिक स्थगिती दिली आहे. याप्रमाणेच २५ मे रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने राज्यभरातील विविध २० याचिकांवर निर्णय देताना १६ जूनपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थितीचे आदेश दिले आहेत. हा निर्णय देताना न्यायालयाने राज्य शासनाला बदली प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्हांतर्गत बदल्याची अंमलबजावणी ३० जूनपर्यंत करावी, असा आदेश आता शासनाने जिल्हा परिषदेला दिला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ३१ मेपर्यंत करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या विरोधात काही शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्याने न्यायालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत बदली प्रक्रिया ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवर निर्णय देताना ३० जूनपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थितीचा आदेश मिळाला आहे. यामुळे राज्य शासनाने जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला एक महिना मुदतवाढ दिली आहे. या एक महिन्यात शिक्षण विभाग अवघड आणि सोपे क्षेत्रातील शाळांची यादी करणे आणि इतर प्रशासकीय काम करणार आहे. मात्र, कोणतीही बदली प्रक्रिया राबविणार नाही. राज्यभरातील अन्य जिल्हा परिषदांमध्ये प्रत्यक्ष बदली आदेश वगळता उर्वरित बदलीप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, जिल्हा शिक्षक संघाने यावर जोरदार आक्षेप घेतला आहे.
जिल्हांतर्गत शिक्षक बदलीला मुदतवाढ
By admin | Published: June 03, 2017 1:47 AM