लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दूधउत्पादन वाढीसाठी जिल्ह्यात राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत ५०० गावांची निवड करण्यात आले आहे. या गावातील ३५ हजार गाई, म्हशींना चांगल्या दर्जाचे रेतन देण्यात आले आहे. त्यांची गर्भधारणा होऊन दुधाचे उत्पादन वाढले आहे. सध्या जिल्ह्यात ५५ ते ६० लाख लिटर दुधाचे रोज उत्पादन घेतले जात आहे. या योजनेत पुण्याने राज्यात आघाडी घेत ७५ टक्के काम पूर्ण केले आहे.
दूधउत्पादन वाढीसाठी चांगल्या प्रतिंच्या संकरित जनावरांसाठी देशात राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांत हा कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील ५०० गावांची निवड करण्यात आली असून, येथील ३५ हजार गाई-म्हशींना कृत्रिम रेतन दिले गेले आहे. यात काहींची गर्भधारणा झाली असून पूर्वीपेक्षा त्यांच्या दूध देण्याच्या दरातही वाढ झाली आहे. या संबंधातील सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने अपलोड करण्याबाबतही जिल्हा पहिला ठरला आहे. या योजनेत निवड करण्यात आलेल्या गावात जनावरांच्या तब्येतीची काळजी, त्यांचे लसीकरण याबाबत पशुसंवर्धन विभागामार्फत लक्ष ठेवले जाणार आहे. केंद्राकडून यासाठी सर्व सुविधा उपलबद्ध करून दिल्या गेल्या आहेत.
जिल्ह्यात १० लाखांच्या आसपास गाई-म्हशी आहेत. टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे कषी व पशुसंवर्धन सभापती बाबूराव वायकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमांतर्गत चांगल्या प्रतिंच्या जनावरांचे रेतन आम्ही जनावरांना दिले आहे. येत्या तीन महिन्यांत याचे चांगले परिणाम दिसतील. यामुळे जनावरांच्या सरासरी दूध देण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे, असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विधाटे यांनी सांगितले.
चौकट
जिल्ह्यात रोज ५५ ते ६० लाख लिटर दूधउत्पादन
पुणे जिल्ह्यात रोज सरासरी ५५ ते ६० लाख दूधउत्पादन होते. यासोबतच नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा येथूनही दूध येते. या नव्या योजनेमुळे जिल्ह्याच्या रोजच्या दूधउत्पादनात वाढ होणार आहे.