फुरसुंगी: हवेली तालुक्यातील फुरसुंगी गावात कालव्यामध्ये एक पुरुष आणि महिला असे दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही मृतदेह कालव्यातून बाहेर काढले. पुरुष मृतदेहाची ओळख पटली नाही, तर स्त्री मृतदेहाची ओळख पटली असून, तो हडपसर- शिंदेवस्ती येथील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
आज्ञा काळूराम घोडेस्वार (वय ५२, रा. शिंदेवस्ती, हडपसर) असे कालव्यात वाहत आलेल्या मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर तरुणाची अद्याप ओळख पटली नसून, याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री एक महिला कॅनॉलमध्ये पडल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. त्याच महिलेचा हा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती असून, पुरुष मृतदेहाची ओळख पटलेली नाही. फुरसुंगी येथील कालव्यामध्ये एका पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची माहिती लोणी काळभोरपोलिसांनी अग्निशमन दलाला सोमवारी सकाळी दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचले. जवान आणि परिसरातील कार्यकर्ते बच्चूसिंग टाक यांनी पुरुषाचा मृतदेह बाहेर काढला. त्याचवेळी एका महिलेचाही मृतदेह वाहत येत असल्याचे जवानांना दिसले. त्यांनी महिलेचा मृतदेह देखील बाहेर काढला. दोन्ही मृतदेह लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.घटनास्थळी तात्काळ हडपसर पोलीस व अग्निशमन दल दाखल झाले होते. मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर काही वेळातच महिलेचाही मृतदेह आढळला. त्यानंतर जवानांनी तोही मृतदेह बाहेर काढला, असे सांगण्यात आले आहे. त्यावेळी तो आज्ञा यांचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान अद्याप त्या तरुणाची ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
शिंदेवस्तीतील महिलेचा मृतदेह
हडपसर परिसरातील शिंदेवस्ती येथे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक महिला कालव्यात पडल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार जवानांनी रात्री महिलेचा शोध घेतला होता. मात्र, महिला सापडली नव्हती. मंगळवारी सकाळी फुरसुंगी येथे महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी शिंदेवस्तीच्या घटनेतील महिलेच्या नातेवाईकांना कळवले. त्यांनी ओळख पटवल्यानंतर तीच महिला असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, पुरुष मृतदेहाची ओळख पटलेली नाही.