नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात पालखी मार्गालगत एका खासगी नेटवर्क कंपनीच्या केबलसाठी परवानगी न घेता सुरूअसलेल्या खोदाईचे काम पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील आणि नीरा ग्रामपंचायतीने अखेर दखल पोलिसांच्या साह्याने बंद पाडले. तसेच पाहणी करून पंचणामे करण्याचे आदेश दिले. याबाबतचे वृत लोकमतने १३ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत सरपंच दिव्या पवार यांनी पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दिली.एका खासगी नेटवर्क कंपनीची केबल टाकण्यासाठी पुरंदर तालुक्यातील जेजुरी ते नीरा पालखी मार्गालगत बांधकाम खात्याच्या हद्दीतील साईडपट्टीवर खोदकाम करण्यात आले आहे. संबंधित कंपनीचा ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या ‘सेटलमेंट’मुळे राजरोसपणे ही खोदाई करण्यात आली आहे. नीरा नदी पुलालगतच्या लोणंद नाक्यापासून पालखी मार्गालगतच्या साईडपट्टीवर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेमध्ये मनुष्यबळाचा वापर करून खोदकाम सुरु करण्यात आले आहे. परंतु बांधकाम खात्याच्या हद्दीतील साईडपट्टीमध्ये खोदकाम करताना नीरा ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रमुख जलवाहिन्या आणि सर्वसामान्यांच्या पाण्याच्या जलवाहिन्या फुटून मोठे नुकसान होणार आहे. जलवाहिन्यांचे मोठे नुकसान होऊन वाहिन्यांच्या दुरुस्तीचा खर्च हा ग्रामपंचायतीला आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही. अशा स्थितीत नीरा शहरात पालखी मार्गालगत खोदाईचे काम करण्यास पुरंदरच्या बांधकाम खात्याने अधिकृत परवानगी दिली असल्याबाबतची कोणतीही माहिती संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायतीला दिलेली नाही. नीरा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच दिव्या पवार, उपसरपंच दीपक काकडे, सदस्य अनिल चव्हाण, बाळासाहेब भोसले, राजेश चव्हाण, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या खोदाईच्या कामामुळे जलवाहिन्यांचे नुकसान होणार असून, पालखी मार्गाच्या डांबरीकरणाचेदेखील नुकसान होणार असल्याचे सांगितले.
पालखी मार्गाची खोदाई रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 1:03 AM