शिक्षक संघाची जिल्हा बँकेला मागणी
शिक्षक संघाची जिल्हा बँकेला मागणी
बारामती : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील सहकारी संस्थांच्या शेअर्सवरील १९-२० या वर्षातील प्रलंबित लाभांश देण्यात यावा. तसेच कॅश क्रेडिटवरील व्याजदरात कपात करा, अशी मागणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. याबाबत शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी माहिती दिली.
जिल्हाभरातील शिक्षक व पगारदार पतसंस्थांचा जिल्हा बँकेकडील शेअर्सवरील २०१९-२० व २०-२१ वर्षातील लाभांश अद्याप मिळालेला नाही. शिक्षक सोसायट्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा जुलै ऑगस्टमध्ये घेण्यात येतात. कोरोनामुळे या सभा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. मात्र वार्षिक सर्वसाधारण सभांची तयारी सर्व संस्थांकडून सुरू आहे, जिल्हाभरातील शिक्षक पतसंस्थांचे प्रत्येकी २ ते ३ कोटींचे शेअर्स जिल्हा बँकेकडे आहेत. या रकमेवर दरवर्षी बँकेकडून लाभांश दिला जातो. मात्र कोरोनामुळे सन १९-२० या वर्षीच्या लाभांश अद्याप मिळालेला नाही, प्रत्येक संस्थेचा २० ते २५ लाखापर्यंत लाभांश रखडल्यामुळे पतसंस्थांचा नफा कमी दिसत आहे. यामुळे लाभांशवाटपात अडचणी येत आहेत. यासाठी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रमेश थोरात यांची भेट घेऊन लाभांश वाटपाची मागणी केल्याचे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, नेते राजेंद्र जगताप, कार्याध्यक्ष पोपटराव निगडे, रमेश मारणे, संजय लवांडे उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणे पगारदार कर्मचारी संस्थांच्या व वैयक्तिक कॅश क्रेडिटवरील व्याजदरात जिल्हा बँकेनेही कपात करावी, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.
————————————————————
रिझर्व्ह बँकेच्या सूचनेमुळे मागील वर्षीचा लाभांश अद्याप दिलेला नाही, मागील लाभांश व कॅशक्रेडिट व्याजदराबाबत संचालक मंडळ बैठकीत तातडीने मार्ग काढला जाईल.
रमेश थोरात
चेअरमन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
————————————————
फोटो ओळी : जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील सहकारी संस्थांच्या शेअर्सवरील १९-२० या वर्षातील प्रलंबित लाभांश देण्यासह विविध मागण्यांबाबत चेअरमन रमेश थोरात यांच्याकडे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने मागणी केली.
२८०४२०२१-बारामती-१२
————————————————