पिंपरी : महापालिका निवडणुकीत प्रभाग चार वॉर्डांचा झाल्याने एका प्रभागात सुमारे ६० हजार मतदार असतील. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांना कसरत करावी लागणार असून, त्यासाठी आतापासूनच नियोजन केले जात आहे. चार वॉर्डांच्या प्रभागामुळे महापालिकेची निवडणूक मिनी विधानसभा झाली आहे. राज्य शासनाने महापालिका निवडणुकांसाठी चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सध्या दोन वॉर्डचा एक प्रभाग आहे. त्यामुळे चार वॉर्डांचा एक प्रभाग करताना मोठ्या प्रमाणात प्रभाग रचनेमध्ये बदल होणार आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत ३२ प्रभाग होण्याची शक्यता आहे. प्रभागरचना जाहीर केल्यानंतर ती नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर नागरिकांना सूचना, हरकती नोंदविता येतील. निवडणूक विभागाकडून सध्या मतदारनोंदणीवर भर देण्यात आला आहे. अधिकाधिक मतदारनोंदणी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सूचनेनुसार कामकाज केले जाणार आहे. प्रभागरचनेचे कामकाज १ सप्टेंबरला सुरू होईल. निवडणूक आयोगामार्फत मतदारनोंदणी अभियान आणि मतदारयादी अद्ययावतीकरणाबाबत काही निर्देश दिले आहेत. मतदारयादीमध्ये नाव चुकणे, पत्ता चुकीचा असणे, मतदारयादीत संबंधित मतदाराऐवजी दुसऱ्याचा फोटो असणे, दुबार नावे याबाबत तक्रारी असतात. त्यामुळे मतदारयादी अद्ययावत करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरातील प्रत्येक महाविद्यालयात मतदारनोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हे अभियान राबविले जाणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठकही बोलाविण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार चालू शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मतदारनोंदणीसाठी जुलैपासून कॉलेजांमध्ये हे मतदारनोंदणी अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)चार वॉर्डांच्या प्रभागात प्रचारादरम्यान मतदारांपर्यंत पोहोचताना कसरत करावी लागणार आहे. तसेच निवडून येण्यासाठी मोठी ताकतही लावावी लागणार आहे. सध्या एका प्रभागामध्ये दोन नगरसेवक असल्याने विकास कामाला उशीर होत आहे. नेमकं उद्घाटन कोणी करायचे? या प्रश्नावरूनच वादंग उटत आहे. एका नगरसेवकाने काम केले तर दुसरा नगरसेवक कामास अडथळा आणत आहे. त्याचा परिणाम विकासकामावर झाला आहे. आता याच ठिकाणी चार नगरसेवक झाल्यानंतर विकास कामे कशी होणार असा प्रश्न विचारला जात आहे.
साठ हजार मतदारांचा होणार प्रभाग
By admin | Published: June 14, 2016 4:42 AM