पुणे-नाशिक महामार्गालगत तुकाईवाडी व वरची भांबुरवाडी ही दोन गावे असेलेले वरची भांबुरवाडी महसुली गाव होते. सध्या महसूल प्रशासनाने वरची भांबुरवाडी व तुकाईवाडी असे विभाजन केले. या विभाजनाला कोणाचा विरोध नसून त्यात समावेश असलेल्या बाबींचा विचार करून विभाजन होणे आवश्यक असताना तसे झाले नाही. लॉकडाऊनदरम्यान ग्रामस्थांशी चर्चा न करता विभाजनाचा नकाशा महसूल विभागाने तयार केला आहे. वरची भांबुरवाडी गावाचे विभाजन नियोजन करताना वनविभाग, गावाचा ओढा, पाझर तलाव, लोकसंख्या भौगोलिक क्षेत्र, नाशिक महामार्गाचा भाग आदींबाबत विचार होणे आवश्यक होते. मात्र, तसे न होता महसूल प्रशासनाने वरची भांबुरवाडी ग्रामस्थांवर अन्याय करून महत्त्वाचा भाग तुकाईवाडी महसुली गावाकडे दर्शवला आहे. त्यामुळे भविष्यातील शासकीय योजना होणार नाहीत. गावाला इतर कोणत्याची स्वरूपाचा महसुली कर मिळणार नाही. गावाच्या विकासाला चालना मिळणार नाही. महसुली गावाचे विभाजन करताना दोन्ही गावांना न्याय मिळावा; अन्यथा या विभाजन प्रक्रियेला तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा सरपंच विजय थिगळे, सुभाष वाळुंज, उपसरपंच नीता ढोरे, सदस्य किशोर रोडे, अनिता राक्षे आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.
वरची भांबुरवाडी व तुकाईवाडी यांचे नुकतेच विभाजन करण्यात आले आहे. विभाजन करताना ग्रामस्थांना विचारात घेतले नाही. कोरोना असल्याचे कारण पुढे केले जात आहे. प्रशासनाने ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेऊन फेरविभाजन करावे.
दोन्ही गावाला फायदा होईल असे विभाजन करावे, अशी मागणी प्रांताधिकारी खेड यांच्याकडे केली असून तसे झाले नाही तर ग्रामस्थ तीव्र आंदोलन उभारणार आहे.
-विजय थिगळे, सरपंच, वरची भांबुरवाडी, ता. खेड