पुणे : कोरोना झाल्यामुळे आणि त्यानंतर ‘ती’ परदेशात गेली. या तांत्रिक बाबी निर्माण झाल्याने तिचा घटस्फोट लांबला होता. मात्र, जपान येथील महिलेची व्हीसीद्वारे ऑनलाईन शपथ घेऊन प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरत कौटुंबिक न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला. कौटुंबिक न्यायालयात पहिल्यांदाच असे प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरण्यात आले आहे.
दोघेही परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यास तयार झाले. मात्र, अडचण ही होती की, ती जपान येथे होती. तिला प्रत्यक्ष हजर राहणे शक्य नव्हते. न्यायालयीन पद्धतीनुसार तिने स्वत: अथवा जपान दूतावासासमोर प्रतिज्ञापत्र केले, तरच घटस्फोट मंजूर होणार होता. मात्र, जपान दूतावासाने प्रतिज्ञापत्र तयार करून देण्यास नकार दिला. तेव्हा प्रथमच ॲड. सुचित मुंदडा आणि ॲड. शीतल बारणे यांनी व्हीसीद्वारे दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर व्हीसीद्वारेच नाझरसमोर तिने शपथ घेतल्यानंतर अर्ज मंजूर केला आणि दोघांचा घटस्फोट मंजूर झाला. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.
रोहन आणि अक्षता (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघेही उच्चशिक्षित आहेत. ती सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. तर तो जर्मन भाषांतराचे काम करतो. पारंपरिक पद्धतीने दोघांचा विवाह २०१५ मध्ये झाला. सुरुवातीपासून दोघांमध्ये वाद होता. त्रासाला कंटाळून रोहन याने २०१६ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यास अक्षता उत्तर देत नव्हती. दरम्यान, कोरोनामुळे दोन वर्षे न्यायालयात यावर कोणताही आदेश झाला नाही. याच कालावधीत ती कंपनीमार्फत जपान येथे गेली. त्यामुळे या प्रकरणात आणखी तेढ निर्माण झाली.
दरम्यान, रोहन याचे वकील ॲड. सुचित मुंदडा आणि ॲड. शीतल बारणे यांनी अक्षताच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यावेळी केलेली चर्चा आणि ॲड. शीतल बारणे यांनी व्हॉट्सॲप आणि फोनद्वारे अक्षताच्या संपर्कात राहून समझोता घडवून आणला. त्यानंतर परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यास ती तयार झाली. मात्र, त्यानंतर तिच्या प्रतिज्ञापत्राबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे ॲड. मुंदडा आणि ॲड. बारणे यांनी व्हीसीद्वारे नाझर यांना अक्षताला पाठविलेल्या प्रतिज्ञापत्राचा अर्ज दिला. तो अर्ज मंजूर करून न्यायालयाने नाझर विजय वैद्य यांना व्हीसीद्वारे शपथ घेऊन प्रतिज्ञापत्र तयार करून त्याचे स्क्रीन शॉट जोडण्यास सांगितले.