लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत काही शारीरिक मर्यादा असूनही दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ‘दिव्य’ यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९३.०१ टक्के लागला असून, यंदा निकालात ४.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.राज्यात दरवर्षी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थीही बारावीच्या परीक्षेला सामोरे जाऊन उत्तुंग यश मिळवितात. राज्य शिक्षण मंडळाकडून या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार परीक्षेसाठी विशेष सवलतीही दिल्या जातात. याचा पुरेपूर लाभ घेत आपल्या शारीरिक समस्यांवर मात करीत या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग, स्पास्टीक्स, अध्ययन अक्षमता, आॅटिझम, सेरेब्रल पाल्सी, गतिमंद अशा एकूण ५ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ६२० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, ५ हजार २२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक १८८० विद्यार्थी अस्थिव्यंग असलेले आहेत. त्याखालोखाल अंध ११९३ व अध्ययन अक्षमता असलेले ११२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. आॅटीझम असलेल्या २५ विद्यार्थ्यांपैकी २३ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळविले आहे.
दिव्यांगांचे ‘दिव्य’ यश
By admin | Published: May 31, 2017 4:10 AM