पुणे : दिव्यांग व्यक्तींचा वावर सहज व्हावा यासाठी अपंग कल्याण आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या सुविधा कुलुपबंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्वच्छतागृहापासून ते वाहनतळाचा वापरही दिव्यांगांना सहजतेने करता येत नाही. पोलीस आयुक्तालयाजवळ राज्याचे अपंग कल्याण आयुक्तालय आहे. दिव्यांगांना सोयी सुविधा देणे, राज्यातील सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगाना अडथळामुक्त वातावरण आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी अपंग कल्याण आयुक्तालयाकडे आहे. एसटी स्टँड, विविध सरकारी कार्यालयांमध्ये अस्थिव्यंग, अंध, मुके, बहिरे अशा विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींचा वावर सहज व्हावा यासाठी रॅम्प, सुयोग्य स्वच्छतागृह, योग्य उंचीवरील पाणपोई, ब्रेल लिपीतील सूचना फलक अशा विविध सोयी करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३ टक्के निधीतून आणि सार्वजनिक कार्यालयांनी कार्यालयीन निधीतून अथवा इतर मार्गांनी अडथळामुक्त वातावरण निर्माण करावे यासाठी देखरेख करणाऱ्या अपंग कल्याण आयुक्तालयातच तसे वातावरण नव्हते. माध्यमांमधून तशी ओरड झाल्यानंतर आयुक्तालयाने दिव्यांगांसाठी खास स्वच्छतागृह उभारले असून, रॅम्प तसेच व्हिलचेअरची देखील सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या शिवाय दिव्यांगांसाठी राखीव पार्किंगचे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, सध्या स्वच्छतागृह कुलुपबंद असून, व्हिलचेअर देखील साखळीबंद आहे. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या जागेवर इतर व्यक्तीच वाहने लावत असल्याचे चित्र आयुक्तालयात दिसून येत आहे. सुगम्य भारत योजनेतून अडथळा विरहित वातावरण निर्माण करण्यासाठी समाज कल्याण विभागाने अपंग कल्याण कार्यालयाच्या आवारात सुविधा उभारल्या आहेत. मात्र, स्वच्छतागृह कायम कुलुपबंद असते. व्हिलचेअर देखील साखळीला अडकविलेले असते. याबाबत समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, स्वच्छता गृहाच्या देखभालीसाठी तरतूद नसल्याने ते कुलुप बंद असल्याचे सांगण्यात आले. इतर व्यक्तींनी वापर करुन स्वच्छतागृह अस्वच्छ होऊ नये यासाठी ते कुलुपबंद ठेवण्यात येईल. मात्र, त्याची चावी कोठे ठेवली आहे, याचा उल्लेख असलेला फलक लावला जाणार असल्याचे उत्तर देण्यात आल्याचे संयुक्त अपंग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे यांनी सांगितले.
अपंग कल्याण आयुक्तालयातच दिव्यांगांच्या सुविधा कुलुपबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 7:15 PM
दिव्यांगांना सोयी सुविधा देणे, राज्यातील सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगाना अडथळामुक्त वातावरण आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी अपंग कल्याण आयुक्तालयाकडे आहे.
ठळक मुद्देस्वच्छतागृहालाही लागलेत टाळेस्वच्छतागृह, योग्य उंचीवरील पाणपोई, ब्रेल लिपीतील सूचना फलक अशा विविध सोयी आवश्यक