बारामती : बारामती शहरात दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम अवयववाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत १०६ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे बळ देण्यात आले. त्यामुळे हे दिव्यांगदेखील आता धडधाकटपणे आयुष्य जगू शकणार आहेत.बारामती येथील कोयनोनिया फाउंडेशन आणि साधु वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. रविवारी (दि ८) येथील बालनिरीक्षण गृह येथे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते अवयवांचे वाटप करण्यात आले. दिव्यांग व्यक्तिंनी खचुन न जाता एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्या यशस्वींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन नगराध्यक्षा तावरे यांनी केले. यावेळी चर्च आॅफ ख्राईस्ट, पुनर्स्थापित ख्रिस्ती मंडळाचे अध्यक्ष डॉ नितीशकुमार वाघमोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी इम्तीयाज शिकीलकर, संभाजी होळकर, जयसिंग देशमुख, अनघा जगताप, अमर धुमाळ, राहुल वाबळे, फैय्याज शेख आदी उपस्थित होते.बारामती येथे झालेल्या शिबिरात बारामती शहर, तालुका, अहमदनगर, जुन्नर, सासवड, श्रीगोंदा, औरंगाबाद येथील दिव्यांग व्यक्तिंना कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले. ऐपत नसणाऱ्या सामान्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे या व्यक्ति देखील इतरांप्रमाणे धडधाकट आयुष्य जगु शकतात. शिवाय दोघा जणांना व्हील चेअर देखील देण्यात आल्या. (प्रतिनिधी)दिव्यांगांना वाटप : २०१२पासून उपक्रम23 आॅक्टोबर रोजी दिव्यांग व्यक्तिंसाठी शिबीर राबविण्यात आले. यावेळी दिव्यांग व्यक्तिंना आवश्यक कृत्रिम अवयवाचे माप घेण्यात आले. त्यानुसार बनविलेल्या अवयवांचे नुकतेच वाटप करण्यात आले.2012 पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एकुण २०९ जणांना आजपर्यंत कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले. याबाबत कोयनोनिया फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव पारधे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, दिव्यांग व्यक्तिंना सक्षमपणे चांगले जीवन जगता यावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. एका दिव्यांग व्यक्तिसाठी जवळपास १५ हजार रुपये खर्च येतो. बहुतांश सर्वसामान्यांना अनेकदा हा खर्च करणे शक्य होत नाही. त्यांना इनलॅक बुधरानी हॉस्पिटलच्या माध्यमातुन हे कृत्रिम अवयव मोफत वाटप करण्यात येतात.
कृत्रिम अवयवातून दिव्यांग होणार धडधाकट
By admin | Published: January 11, 2017 2:05 AM