पुणे : दिवाळीच्या दरम्यान पुण्याहून इतर जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून १५०० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्याहून मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिवाजीनगर बसस्थानकावरून येथे जाण्यासाठी प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेऊन खडकी येथे तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी प्रवाशांनी खासगी वाहनांपेक्षा एसटीचा पर्याय निवडून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.
१९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत औरंगाबाद, अकोला, नागपूर, यवतमाळ, अमरावती, जळगाव, धुळे, नाशिक, जालना, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, बीड आणि बुलढाणा या मार्गांवर जाणाऱ्या प्रवाशांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड खडकी येथून ऑनलाईन रिझर्व्हेशन करताना (PUNECNT) चा पर्याय निवडावा. यासह राज्य परिवहन महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावरून घरबसल्या मोबाईल रिझर्व्हेशन ॲपवरून, जवळच्या बसस्थानकावरून तसेच इतर खासगी ॲपवरूनही आगाऊ आरक्षण करता येणार आहे.
स्वारगेट बसस्थानकावरून सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, मुंबई, पंढरपूर, उमरगा, बार्शी, मंगळवेढा, अक्कलकोट या शहरांसाठी बस सुटेल. तर वल्लभनगर आगारातून कोकणातील रत्नागिरी, गुहागर, कणकवली, चिपळूण, सिंधुदुर्ग, मालवण या ठिकाणी जाणाऱ्या बसेस सुटतील, यासह नाशिक, शेगाव आणि अकोल्यालादेखील काही प्रमाणात गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर दिवाळीच्या दोन दिवस आधीपासून आम्ही राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या नियमित बसेससह १५०० जादा बसेसचे नियोजन केले असून प्रवाशांनी याचा लाभा घ्यावा, असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे यांनी केले.